आजपासून लिलाव प्रक्रियेस होणार प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. रेल्वेस्थानकासमोर असलेल्या कारवार बसस्थानक आवारातील गाळय़ांची इमारत खराब झाल्याने या ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 12 नवीन गाळय़ांची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी सहा गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
ई लिलावाच्या माध्यमातून गाळय़ांसाठी बोली लागणार आहे. दि. 20 जूनपासून लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होणार असून, बोली लावण्यासाठी दि. 12 जुलै अंतिम मुदत आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात विविध ठिकाणी व्यावसायिक संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये काही मार्केट ब्रिटिशकालीन आहेत. तसेच नव्याने काही गाळय़ांची उभारणी करण्यात आली आहे. गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येत असल्याने कॅन्टोन्मेंटला महसूल मिळतो. मात्र कारवार बसस्थानक आवारातील गाळे मोडकळीस आले होते. येथील इमारती जीर्ण झाल्याने पावसाचे पाणी गाळय़ांमध्ये शिरत होते.
या ठिकाणी एका हॉटेलसह सहा गाळय़ांची इमारत हटविण्यात आली होती. मात्र या ठिकाणी सध्या प्रशस्त बसस्थानकासह 12 गाळय़ांची उभारणी केली आहे. यापैकी 6 गाळे जुन्या भाडेकरूंसाठी तर 6 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी ई लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे.









