प्रतिनिधी/ कारवार
संपूर्ण जिल्हय़ाचे लक्ष लागून राहिलेल्या कारवार नगरपालिका अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली. नगराध्यक्षपदी भाजपचे डॉ. नितीन एस. पिकळे आणि भाजपचेच प्रकाश पी. नाईक यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.
येथील कन्नड भवनमध्ये असिस्टंट कमिशनर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. गेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या डॉ. पिकळे यांनी अध्यक्षपदासाठी तर अपक्ष निवडून आलेल्या तथापि भाजपला समर्थन दिलेल्या प्रकाश पी. नाईक यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तथापि, काँग्रेसच्या उमेदवारांना निर्धारित वेळेत पदाधिकारी पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाहीत. काँग्रेस पदाधिकारीपदी इच्छुक असलेले उमेदवार निवडणूकस्थळी दाखल झाले. पण उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ निघून गेल्याने निवडणूक अधिकाऱयांनी अध्यक्षपदासाठी डॉ. नितीन पिकळे आणि उपाध्यक्षपदी प्रकाश पी. नाईक यांची निवड झाल्याचे घोषित केले.
31 सदस्य संख्या असलेल्या नगरपालिकेवर भाजपचे केवळ 11 उमेदवार निवडून आले होते. तथापि, भाजपला निजदचे नेते आणि माजी मंत्री आनंद असनोटीकर यांनी निजदच्या चार सदस्यांचा पाठिंबा दिल्याने व पाच अपक्ष उमेदवारांनी भाजपची साथ देण्याची भूमिका घेतल्याने भाजपला अल्पमत असूनही सत्ता काबीज करणे शक्मय झाले.
भाजपचा जल्लोष
डॉ. नितीन पिकळे यांची अध्यक्षपदी आणि प्रकाश पी. नाईक यांची उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आल्याचे स्पष्ट होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली. कारवार-अंकोल्याच्या आमदार रुपाली नाईक यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड झालेल्यांचे पुष्पहार, शाल अर्पण करून अभिनंदन केले.
स्मार्ट नगर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न
याप्रसंगी अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. नितीन पिकळे म्हणाले, कारवार नगराचे स्मार्ट नगरात परिवर्तन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. नगरातील सर्व वॉर्डांचा विकास घडवून आणण्यासाठी जातीने लक्ष देऊ. ज्यांच्या समर्थनामुळे भाजपला सत्ता काबीज करणे शक्मय झाले त्या माजी मंत्री आनंद असनोटीकर यांचे आभार मानायला ते विसरले नाहीत.
यावेळी आमदार रुपाली नाईक यांचेही भाषण झाले. माजी नगराध्यक्ष गणपती उळवेकर यांच्यासह भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होते.









