महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी : मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा, गोकर्णमध्ये श्रद्धाळुंच्या संख्येत घट
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील गोकर्ण, मुर्डेश्वर, याण, बनवासी, सहस्त्रलिंग, कवळे गुहा यासह शेकडो शिवमंदिरात महाशिवरात्रीचे पर्व श्रद्धापूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. जिल्हय़ातील अनेक शिवमंदिरांच्या आवारांना जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. सर्वत्र ओम नमः शिवाय, हर हर महादेवचा जयघोष सुरू असल्याने जिल्हय़ातील वातावरण गुरुवारी शिवमय बनून राहिले होते. शिवलिंगाच्या दर्शनासाठी श्रद्धाळुंनी सकाळीच मंदिराकडे धाव घेतली. त्यामुळे अनेक मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतेक शिवमंदिरामध्ये श्रद्धाळुंनी अभिषेक करून महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी पुण्य पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. पूजा-अर्चा आरती, महाप्रसाद वितरण आदींना सर्वत्र ऊत आला होता.
दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया पुराणप्रसिद्ध गोकर्ण येथे पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. काही भाविक बुधवारीच गोकर्ण येथे दाखल झाले होते. काही श्रद्धाळुंनी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अरबी समुद्रात तर काहींनी कोटीतीर्थात डुबकी घेतली आणि पहिल्यांदा महागणपतीचे (दुर्मीळ द्विमुखी गणपती) दर्शन घेतले आणि त्यानंतर महाबळेश्वर देवालयातील आत्मलिंगाचे दर्शन घेतले. अन्य ठिकाणाहून गोकर्ण येथे दाखल झालेल्या श्रद्धाळुंनी मंदिराच्या आवारात पुरोहितांकरवी विविध प्रकारच्या धार्मिक विधी केल्या.
गोकर्णमध्ये दाखल झालेल्या श्रद्धाळुंच्या संख्येत मोठी घट
महाशिवरात्रीनिमित्त प्रत्येक वर्षी गोवा, महाराष्ट्रसह अन्य राज्यातील हजारो भाविक गोकर्णमध्ये दाखल होत असतात. तथापि, यावर्षी कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेमुळे गोवा आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकांनी गोकर्णला येणे टाळले. पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्हय़ातील श्रद्धाळुंची अनुपस्थिती स्पष्टपणे जाणवत होती. त्यामुळे प्रत्येक वर्षी दिसून येणारी गर्दी, रांगा यावर्षी दिसून आल्या नाहीत. श्रद्धाळुंच्या सख्येत घट झाल्याने यावर्षी गोकर्णमध्ये वाहतूक कोंडीच्या किंवा पार्किंग समस्येने डोके वर काढले नाही.
समुद्र किनाऱयावर होणाऱया समुद्र स्नानाकडे लक्ष
दरम्यान मुर्डेश्वर, याण, बनवासी, कवळे गुहा सह कारवार तालुक्यातील माजाळी येथील रामनाथ, शेजवाड येथील शेजेश्वर, बाड-कारवार येथील महादेव देवस्थानात महाशिवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. आता जिल्हावासियांचे लक्ष माजाळी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील बावळ समुद्र किनाऱयावर होणाऱया समुद्र स्नानाकडे लागून राहिले आहे. समुद स्नानानिमित्त समुद्र किनाऱयावर विविध देवतांच्या पलख्यांचा सोहळा होणार आहे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी ड्रेसकोड
गोकर्ण येथील महाशिवरात्रोत्सवाचे यावर्षीचे खास वैशिष्टय़ म्हणजे मंदिरात प्रवेश करण्यासाठी सक्तीचा करण्यात आलेला ड्रेसकोड. ड्रेसकोड पुरुष आणि महिलांसाठीही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जीन, थ्रीफोर्थ आदी वेश परिधान करणाऱयांना मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी अतिमहनीय व्यक्ती गोकर्णला हमखास हजेरी लावतात. तथापि, यावर्षी एकही अतिमहनीय व्यक्ती गोकर्णमध्ये दाखल झाली नाही. श्रद्धाळुंच्या संख्येत यावर्षी मोठी घट झाल्याने याचा परिणाम अर्थिक उलाढालीवर झाला. परिणामी व्यापारी वर्गात नाराजी पसरल्याचे दिसून आले.









