घराबाहेर न पडता आवारातच तालुकावासियांकडून होळीचा सण साजरा
प्रतिनिधी / कारवार
कोरोना महामारीच्या जिल्हा प्रशासनाने लादलेल्या कठोर निर्बंधामुळे कारवार तालुक्यात सोमवारी रंगाची उधळण अपेक्षित प्रमाणात करता आली नाही. सलग दुसऱया वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होळीचा सण मोठय़ा उत्साहात साजरा न करता आल्याने नागरिकांनी विशेष करून युवा पिढीने नाराजी व्यक्त केली. कारवार तालुक्यात ठिकठिकाणी युवकांनी रंगाची उधळण केली हे खरे असले तरी प्रत्येक वर्षी रंगपंचमीच्या दिवशी विविध रंगांनी न्हाऊन निघणारा माहोल या वर्षी दिसून आला नाही. प्रशासनाने यावर्षी डीजे, ध्वनिवर्धक आदींवर बंदी घातली होती. त्यामुळे प्रत्येक वर्षी होळीच्या गाण्यांवर थिरकणारे पाय या वर्षी अभावानेच दिसून आले. सरकारी नियमांचे उल्लंघन करून होळीचा सण साजरा करणाऱयांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला होता. त्यामुळे नियमांचे पालन करण्यासाठी आणि स्वतःला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी कारवार तालुकावासियांनी घराबाहेर न पडता घरांच्या आवारातूनच होळीचा सण साजरा केला.
सलग दुसऱया वर्षी विविध रंगांची आणि अन्य साहित्याची विक्री करणारी दुकाने थाटण्यात आली नाहीत. त्यामुळे होळीनिमित्त होणारी उलाढालही यावर्षी थंडावल्याचे दिसून आले. येथील रंगपंचमीचे खास वैशिष्टय़ म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत रंगाची उधळण करायची आणि त्यानंतर मनसोक्तपणे अरबी समुद्रात डुबायचे. मात्र यावर्षी प्रशासनाने नागरिकांच्या समुद्र किनाऱयावर प्रवेश बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांनी अरबी समुद्राकडे धाव घेण्याचे टाळले.
कुमठा आणि अंकोला तालुक्यातही होळी साजरी
जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील कुमठा व अंकोला तालुक्यातही सोमवारी होळीचा सण साध्या आणि शांत वातावरणात साजरा करण्यात आला. अंकोला तालुक्यातील होळीच्या सणाला श्रीमंत परंपरा आहे. तथापि, यावर्षी अंकोला तालुक्यात होळीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱया स्तब्धचित्र रुपक, मिरवणूक आदींवर बंदी घालण्यात आल्याने वेशभूषा विविध नृत्ये सांकेतिकरित्या साजरी करण्यात आली.
खासदार अनंतकुमार हेगडे यांच्याकडून होळी साजरी

शिरसी येथे कोरोना डोन्ट केअर असे म्हणत होळीचा सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शिरसी येथे दोन वर्षातून एकदा होळीचा सण साजरा केला जातो. शिरसी नगराच्या वेगवेगळ्या सर्कलमध्ये जमा झालेल्या नागरिकांनी रंगाची उधळण केली. गेल्या महिन्यात पायावर शस्त्रक्रिया झाल्याने नागरिकांपासून आणि विविध कार्यक्रमांपासून दूर राहिलेले कारवारचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी रंगांची उधळण करून होळीच्या सणाचा आनंद लुटला.
कामण्णा आणि रतीदेवी मूर्तींचे पूजन
दरम्यान, हल्याळ येथील मेदर गल्ली, कुंभार गल्ली, चलवादी गल्ली, गौरी गुढीजवळ आणि अन्य स्थळी कामण्णा व रतीदेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून विशेष पूजन करण्यात आले होते. सिद्धापूर तालुक्यातही होळीचा सण पारंपरिक आणि उत्साहात साजरा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जिल्हय़ातील यल्लापूरसह अन्य काही ठिकाणी रंगपंचमी दिवशी रंगांची उधळण केली जाणार आहे.









