बेंगळूरच्या युवकाचा भटकळमधील युवतीशी विवाह सोहळा पडला महागात
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ात सोमवारी तब्बल 81 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 433 झाली आहे. एकाच दिवसात बाधितांची एवढय़ा मोठय़ा संख्येने वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाची आणि जिल्हावासियांची झोप उडाली आहे.
दरम्यान, येथील किम्समध्ये उपचार सुरू असलेल्या 42 वषीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपचार सुरू असताना दगावलेला हा पहिलाच आणि जिल्हय़ातील दुसरा कोरोनाबाधित आहे. यापूर्वी यल्लापूर येथील महिला कोरोनामुळे दगावली होती. तथापि, त्या वृद्धेचा मृत्यू घरीच हृदयविकाराच्या झटक्मयाने झाल्याचे स्पष्ट झाले होते.
सोमवारी अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायकरीत्या बाधितांच्या संख्येत भर पडली आहे. 81 पैकी भटकळ नगरातील बाधितांची संख्या 45 आहे. कुमठा तालुक्मयातील बाधितांची संख्या 20, होन्नावर तालुक्मयातील 9, कारवार तालुक्मयातील 5 आणि शिरसी आणि यल्लापूर तालुक्मयातील प्रत्येकी एक बाधिताचा समावेश आहे.
‘तो’ विवाह सोहळा महागात पडू लागला आहे
भटकळ नगरात गेल्या महिन्याच्या 23 तारखेला भटकळमधील युवतीशी बेंगळूरच्या युवकाचा विवाह झाला होता. त्यावेळी त्या युवकाने आपण कोरोना बाधित आहे, असे कुणालाही सांगितले नव्हते. विवाहानंतर तो नवरदेव उपचारासाठी मंगळूरमधील रुग्णालयात दाखल झाला होता आणि विवाह झालेल्या अवघ्या पाचव्या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. त्या लग्न सोहळय़ाला भटकळमधील अनेक जणांनी हजेरी लावली होती. यामध्ये भटकळच्या एका माजी आमदारासह काही मान्यवरांचाही समावेश होता. विवाह सोहळय़ाला उपस्थित राहिलेल्यांना आता फार मोठी किंमत मोजावी लागत आहे. कारण आता भटकळ शहरात नोंद होत असलेले बहुतेक बाधित लग्न सोहळय़ाला हजर राहिले होते, असे सांगण्यात येत आहे.
पुणे व्हाया बेंगळूर, कुमठा तालुक्मयात दाखल झालेल्या युवतीमुळे कुमठा तालुकावासियांना फार मोठी किंमत मोजावी लागत आहे. सोमवारी कुमठा तालुक्मयात नोंद झालेले 20 बाधित त्या युवतीच्या संपर्कात आले होते, असे सांगण्यात आले.
बेंगळूरहून येताना कोरोना घेऊन आला
शिरसी तालुक्मयातील बाळगार येथे 42 वषीय व्यक्ती बेंगळूरहून आली होती. आजारी पडल्यामुळे उपचारासाठी त्या व्यक्तीला शिरसी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्या व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तपासणीच्या वेळी त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रविवारी रात्री त्या व्यक्तीला येथील किम्समध्ये हलविण्यात आले होते. बाधिताची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्याचे निधन झाले. त्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच झाला आहे, हे खरे असले तरी अद्याप जिल्हा प्रशासनाने तशी अधिकृत घोषणा केलेली नाही.








