सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात : परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त, विजयी उमेदवारांचे हार घालून अभिनंदन
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील 227 ग्राम पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शांत वातावरणात झाली. मतमोजणी प्रक्रिया अधिक वेळ घेत असल्यामुळे बुधवारी रात्री 11 ते 11.30 वाजेपर्यंत सर्व निकालांसाठी वाट पहावी लागेल, असे सांगण्यात आले. 22 आणि 27 डिसेंबर अशा दोन टप्प्यात जिल्हय़ातील 2 हजार 467 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 7 हजार 187 उमेदवारांपैकी काही उमेदवारांचा निकाल आतापर्यंत लागला आहे तर काही उमेदवारांना आपल्या नशिबात काय वाढून ठेवले आहे, हे पाहण्यासाठी आणखी काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कारवार तालुक्मयातील 18 ग्राम पंचायतींसाठी झालेल्या निवडणूक मतमोजणीची व्यवस्था येथील सेंट मायकल कान्व्हेंट हायस्कूलमध्ये केली होती. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी प्रक्रियेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून हायस्कूलच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मतदान केंद्रावर एकतर उमेदवाराला किंवा त्याच्या एजंटना प्रवेश देण्यात आला. पत्रकारांनाही मतदान केंद्रावर जाऊ देण्यात आले नाही. मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वीच वेगवेगळय़ा राजकीय पक्षांचे समर्थक व उमेदवारांचे कुटुंबीय येथे दाखल झाले होते. सकाळी सात वाजल्यापासून कारवार तालुक्मयातील ग्रामीण प्रदेशातील वाहनांची कारवारच्या दिशेने मोठी रांग लागली होती.
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या जुन्या कार्यालयाजवळ वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. उमेदवार, एजंट, समर्थकांना आणि उमेदवारांच्या कुटुंबीयांना मित्रसमाज मैदानावर प्रतीक्षा करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे मैदानावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. मतमोजणी केंद्रावरून स्पीकरवरून घोषणा झाल्यानंतर उमेदवारांना मतमाजणी केंद्रावर रांगेने सोडण्यात येत होते.
विजयी उमेदवारांची सावध भूमिका
अगदी कालपर्यंत उमेदवार आपण या पक्षाचे त्या पक्षाचे असे सांगत होते. तथापि, विजयी उमेदवारांना तुम्ही कोणत्या पक्षाचे? असे विचारले असता बहुतेक उमेदवारांनी आपल्यावर ठरावीक पक्षाचा शिक्का मारून घेण्याचे टाळले. त्याऐवजी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपण अपक्ष उमेदवार म्हणून सांगणे पसंत
केले.
तीनपैकी दोन ता. पं. सदस्य विजयी
कारवार तालुका पंचायतीचे तीन विद्यमान सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यापैकी सुरेंद्र गावकर (मुडगेरी) आणि पुरुषोत्तम गौडा (अमदळ्ळी) यांनी बाजी मारली. तथापि, प्रशांत गोवेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच कारवार तालुका पंचायतीच्या माजी अध्यक्षा आरती बानावळी मुडगेरी ग्राम पंचायतीवर निवडून आल्या आहेत.
पत्रकाराचा पराभव
तालुक्मयातील हणकोण ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत सुनील नाईक हे पत्रकार उतरले होते. तथापि, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. असनोटी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत वकील संजय साळुंके आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते अरुणकुमार साळुंके यांच्या दरम्यान चुरशीचा सामना रंगला होता. तथापि, बाजी मात्र वकील साळुंके यांनी मारली. संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागून राहिलेल्या सदाशिवगड ग्राम पंचायतीवर दीपक देसाई, किशोर देसाई, सूरज देसाई, विजय देसाई, स्वाती देसाई, वंदना मालसेकर, विनय नाईक, गायत्री कदम, संपदा शिरोडकर आदी सदस्य निवडून आले.









