तालुका ठेकेदार संघ-जनशक्ती मंचचे अध्यक्ष माधव नाईक यांची माहिती
प्रतिनिधी / कारवार
सरकारी ठेकेदारांना सामना करावा लागणाऱया विविध प्रकारच्या गंभीर समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 23 रोजी येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीचे निदर्शन आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती कारवार तालुका नोंदणीकृत ठेकेदार संघाचे आणि जनशक्ती मंचचे अध्यक्ष माधव नाईक यांनी दिली.
ते येथील पत्रकार भवनात पत्रकाराशी बोलताना, या निदर्शनाचा तपशील देण्यास नकार देऊन पुढे म्हणाले, अनेक ठेकेदार वेगवेगळ्या आर्थिक संस्थाकडून कर्ज घेऊन सरकारी कामे पूर्ण करीत असतात. तथापि ठेकेदारांना त्यांनी केलेल्या कामांची बिले वेळेत दिली जात नाहीत. स्थानिक संस्था, लघु पाटबंधारे खाते, सार्वजनिक बांधकाम खात्यासह अन्य सरकारी खात्यांची रस्ते, इमारतीचे बांधकाम, गटार योजनांची कामे पूर्ण करूनही बिले पदरात पाडून घेण्यासाठी धावपळ करावी लागते. परिणामी याचा आर्थिक फटका ठेकेदारांना बसत आहे. असे स्पष्ट करून नाईक पुढे म्हणाले, अलिकडे छोटय़ा छोटय़ा कामांचा एकत्रित समावेश करून अशा प्रकारची कामे ही मोठय़ा ठेकेदारांना दिली जात आहेत. त्यामुळे छोटय़ा ठेकेदारांनी करावे काय, असा प्रश्न उपस्थित केला.
गेल्या काही वर्षापासून बांधकामासाठी येथे वाळू मिळत नाही. त्यामुळे अन्य तालुक्यातून वाळू आणावी लागते. इतकेच नव्हे तर सिमेंट, खडी आदी साहित्याचे दर वाढले आहेत. परिणामी ठेकेदार अधिकच अडचणीत आले आहेत. आणि म्हणूनच सरकारने ठेकेदारांची बिले वेळेत देण्याची व्यवस्था करावी, असे सांगितले.
दोन मतदार संघाचा अपवाद वगळता इतरत्र टक्केवारींचा व्यवहार
माधव नाईक पुढे म्हणाले, जिल्हय़ातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी दोन मतदारसंघांचा अपवाद वगळता अन्य मतदार संघात टक्केवारीचे व्यवहार सुरू आहेत. ही समस्या कुणापुढे मांडायची याबद्दल नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. कोणत्या मतदार संघात टक्केवारी व्यवहार सुरू आहे, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, नाईक म्हणाले, तुम्ही पत्रकार फार हुशार आहात. तुम्हाला सर्व काही माहीत आहे. मी सांगायची काही एक गरज नाही.
यावेळी संतोष सैल, सुमीत असनोटीकर, उदय नाईक, राजेश शेट, डी. के. नाईक आदी उपस्थित होते.









