प्रतिनिधी / कारवार
कारवार, हल्याळ आणि सुपा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सीमा लढय़ातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आदरांजली वाहण्यासाठी तालुक्यातील सदाशिवगड येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अखिल भारत कोकणी परिषदेच्या आणि सदाशिवगड येथील कोकणी संस्कृती मंडळाच्या अध्यक्षा उषा राणे म्हणाल्या, गेल्या 65 वर्षांपासून आम्ही न्यायासाठी लोकशाहीमार्गाने झगडत आहोत. तथापि आमच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. यासारखे दुर्दैव नाही. प्रत्येक वर्षी 17 जानेवारी रोजी सीमाभागातील कारवारसह खानापूर, बेळगाव, निपाणी येथे हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते. जोपर्यंत आम्हा सीमाबांधवांना केंद्र किंवा महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांना खऱया अर्थाने शांती मिळणार नाही. असे स्पष्ट करून उषा राणे पुढे म्हणाल्या, किमान आतातरी केंद्र व महाराष्ट्र सरकारने आम्हाला आमच्या मागणीच्या राज्यात समाविष्ट करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.
याप्रसंगी बोलताना नरेश राणे म्हणाले, सीमाबांधवांना न्याय मिळवून देण्यात यापूर्वीच मोठा विलंब झाला आहे. केंद्र सरकारने पुन्हा आता विलंब करायचा प्रयत्न करू नये. सीमाबांधवांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, किमान आतातरी संबंधित सरकारने ठोस पावले उचलावित आणि ज्यांनी ज्यांनी सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी हुतात्म्य पत्करले, तुरुंगवास भोगला, त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी केली.
यावेळी सुनील ऐराळ, प्रकाश पालनकर, आशा पालनकर, यशवंत दातेसह कोकणी आणि मराठी प्रेमी उपस्थित होते.









