टोप/ वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील कासारवाडी स्पोर्टस क्लबच्यावतीने आयोजित ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य डॉ. प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कासारवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच शोभाताई खोत, उपसरपंच आनंदा खोत, माजी सरपंच शंकर वागवे आदी उपस्थित होते. या फुटबॉल स्पर्धेसाठी २५ संघानी सहभाग नोदविला आहे.
यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, खेळात आपला सर्वांगीण विकास होतो. आपली मानसिक तसेच शारीरिक वाढ होते. खेळाडू वृत्तीमुळे नवनवीन गुणांची जोपासना होते. ग्रामीण भागातील खेळाडूचे मन मनगट आणि मेंदू बळकटीकरणासाठी खेळ महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. प्रदीप पाटील यांचा सत्कार सचिन पवार यांनी तर सरपंच शोभाताई खोत यांचा सत्कार शरद जोधळे यांनी केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिला खाडे, मनिषा यादव, साधना खाडे, वैशाली वरुटे, अनिता वागवे, आनंदा पोवार, सुर्यकांत कुंभार, तंटामुक्त समिती अध्यक्ष धनाजी निकम, उपाध्यक्ष लखन लुगडे, पांडुरंग लुगडे,आदिनाथ मुळिक यांच्यासह सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अभयसिंह माने यांनी मानले.









