प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड औद्योगिक वसाहतीतील नांगलवाडीनजीक एका बंद होंडासिटी कारमध्ये गुदमरून सोहेल जकात खान (5) व अब्बास जकात खान (3) या सख्ख्या भावंडांचा अंत झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली.
महाड औद्योगिक वसाहतीतील नांगलवाडी येथे एका भंगार दुकानाजवळ एम. एच. 04/ बी.के. 7537 क्रमांकाची कार उभी होती. या कारमध्ये सोहेल व अब्बास हे सख्खे भाऊ खेळत होते. खेळताना त्यांच्या हातून कारचा दरवाजा अचानक लॉक झाला. दोघांनाही बंद कारचा दरवाजा व काचा उघडणे जमले नाही. यामुळे कारमध्ये गुदमरून दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेची खबर मिळताच महाड औद्योगिक वसाहतीतील पोलीस यंत्रणा व साळुंखे रेस्क्यू टीम पथकाचे प्रशांत साळुंखे व सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधील दोघांचेही मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी महाड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने नांगरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.









