माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो केवळ एकटा राहू शकत नाही. त्यामुळेच तो आपल्या अवतीभवती माणसांचीच एक जणू तटबंदी निर्माण करतो. त्यांना विविध नात्यांची नावे देतो. जन्मतःच त्याला आईबाप तर असतातच. त्यांच्याच अनुषंगाने त्याची इतर नाती निर्माण होतात. विवाहानंतर आणखी अधिक नाती निर्माण होतात तर काही रक्ताच्या नात्याशिवायही इतर नाती असतात. ज्यांच्याशी त्याचे जिव्हाळय़ाचे संबंध असतात. कधी ते शेजारी असतात, कधी मित्र असतात. ही नाती त्याला हवीशी असतात. पण काही नकोशी नातीही असतात. तिथे त्याचे शत्रुत्व निर्माण होते. ही सख्खी, सावत्र, जिव्हाळय़ाची, आपुलकीची, प्रेमाची नाती असोत किंवा द्वेष, मत्सर, शत्रुत्व असो, कोणतीही नाती निर्माण होण्याचे काहीतरी कारण हे असतेच. ते म्हणजे स्वार्थ! म्हणूनच कवी म्हणतो-
न कश्चित्कस्यचिन्मत्रिं न कश्चित्कस्यचिद्रिपुः। कारणेन हि जायन्ते मित्राणि रिपवस्तथा।। अर्थ -कोणी कोणाचा (कायमचा) मित्र नसतो, कोणी कुणाचा (कायमचा) शत्रू नसतो. कोणत्या तरी कारणामुळेच मित्र किंवा शत्रू निर्माण होतात. माणसाला मित्र किंवा शत्रू हे कोणत्यातरी स्वार्थामुळेच निर्माण होतात. ज्याच्याशी त्याचे विचार जुळतात, त्याचा आर्थिक फायदा होतो, समाजात त्याचा मान, प्रति÷ा वाढते, त्याच्यावर प्रेम करणाऱया ज्या ज्या व्यक्ती भेटतात त्यांच्याशी त्याची मैत्री होते. पण त्याला नावे ठेवणाऱया, त्याच्याबद्दल वाईट भावना बाळगणाऱया, आर्थिक नुकसान करणाऱया, भले न चिंतणाऱया व्यक्तीशी त्याचे शत्रुत्व निर्माण होते. काही वेळा शत्रुशीदेखील स्वार्थासाठी गोड बोलून मतलब साधावा लागतो. ह्या गोष्टी देवालाही चुकल्या नाहीत, हे सांगणारा एक मजेदार श्लोक पहा- गणेशः स्तौति मार्जारं स्ववाहस्याभिरक्षणे। महानपि प्रसङ्गेन नीचं सेवितुमिच्छति।। अर्थ- स्वतःच्या वाहनाच्या (उंदराच्या) संरक्षणासाठी गणपती मांजराची स्तुती करतो. (पहा ना!) थोर लोकांनाही प्रसंगी नीच लोकांची सेवा करावी लागते!
छत्रपती शिवाजीमहाराजांना देखील स्वराज्यरक्षणासाठी कित्येकदा शत्रूबरोबर तह करावे लागले हा इतिहास आपल्याला माहीत आहे. थोरामोठय़ांना एखादे मोठे काम पार पाडण्यासाठी नीच मनोवृत्तीच्या माणसांशीही प्रसंगी जुळवून घ्यावे लागते. राजकारणात तर आपल्याला हे सर्रास पहायला मिळते. तिथे कोणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. काल गळय़ात गळे घालून मिरवणारे आज एकमेकांचे तोंड पहायलाही तयार नसतात. काल सगळे काही चांगले वाटणारे एका रात्रीत पालटून टोकाचा विरोध करू लागतात. हे आपण नेहमी पाहतोच. त्यामुळे कवीने केलेले वर्णन किती चपखल आहे पहा!








