मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ऑनलाईन राष्ट्रीय प्रश्नमंजुषेचे आयोजन
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
देशाचा 21 वा कारगिल विजय दिन 26 जुलै रोजी म्हणजेच आज साजरा केला जाणार आहे. या दिनानिमित्त मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नमंजुषेच्या आयोजनाची घोषणा केली आहे. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. कारगिल युद्धासंबंधी जाणून घेण्यासाठी यंदा कारगिल विजय दिनी स्वतःच्या योद्धय़ांना समर्पित राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा आयोजित केली जाणार असल्याचे निशंक यांनी म्हटले आहे.
स्पर्धेत सामील होण्यासाठी इच्छुकांना 27 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. या स्पर्धेत सामील होणाऱया उमेदवारांना एक प्रमाणपत्रही मिळणार आहे. तसेच 80 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱया स्पर्धकांना केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, एनसीईआरटीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची स्वाक्षरी असलेले एक प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.
या स्पर्धेत सामील होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन आयोजित होणाऱया या स्पर्धेत 6 प्रश्न विचारले जाणार आहेत. एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 60 सेकंदांचा कालावधी मिळणार आहे. चुकीचे उत्तर दिल्यास नकारात्मक गुणांकन होणार नाही.









