ढाका / वृत्तसंस्था
बांगलादेशातील एका कारखान्यात शुक्रवारी भीषण आग लागून 52 जण ठार झाले. या भीषण दुर्घटनेत बहुमजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत कमीतकमी 30 लोक जखमी झाले आहेत. इमारतीला आग लागल्याची जाणीव होताच कामगारांनी आपला जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावरून खाली उडय़ा मारल्याने अनेक जण जखमी झाले. तसेच काहीजण अद्याप बेपत्ता असल्याची नोंद आहे.
कारखान्यात 1000 हून अधिक कामगार काम करत होते. मात्र, आगीनंतर बहुतेक जणांनी आपला जीव वाचवला. या कारखान्यात नूडल्स, फळांचा रस आणि कँडी तयार केली जात होती. अत्यंत ज्वलनशील रसायने आणि प्लास्टिक मोठय़ा प्रमाणात आत ठेवल्यामुळे सहा मजली कारखान्याला आग लागली. तळमजल्यावर आग लागल्यानंतर ज्वलनशील पदार्थांमुळे काही मिनिटातच आग भडकल्याची माहिती या आगीतून वाचलेला कारखान्यातील कामगार मोहम्मद सैफुल याने दिली.









