मानवी शरीर हे अमर नाही. जन्माला आल्यापासून ते वृद्धापकाळापर्यंत आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. अंतर्गत होणाऱया बदलाबरोबरच आजूबाजूच्या वातावरणाचा, माणसांचा, आणि अनुभवांचा प्रभाव शरीरावर सतत पडत असतो. काळाप्रमाणे शरीर जपणे अत्यावश्यक असते. कडाक्मयाच्या उन्हात शरीर आतून रुक्ष पडल्यासारखे वाटते. त्यासाठी माणूस थंडगार पेय, आईस्क्रीम, पाणी या सगळय़ांची मदत घेऊन शरीराला थंड करतो. तसेच, आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन योग्य तो उपचार घेणे अपेक्षित असते. शेवटी प्रत्येक शरीराचीसुद्धा एक ठरावीक प्रकृती असते. काही लोकांची ठेवण दणकट आणि धडधाकट असते तर काही लोक त्यांच्या तुलनेत नाजूक असतात. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार वावरत असतो.
हाच तर्क शरीरातील प्रत्येक इंद्रियांना लागू पडतो. काही लोकांची पचनशक्ती छान असते, तर काहींना आयुष्यभर पोटाचे विकार सहन करावे लागतात. अशाच छोटय़ा मोठय़ा विकारांमुळे होणारा त्रास कमी करायला आयुष्यात काही बदल करावे लागणार असतील तर माणूस त्यांना नक्कीच प्राधान्य देतो. आहारामधले हानिकारक पदार्थ बंद करतो, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतो आणि योग्य ते उपचार करून घेतो. हे सर्व करत असताना त्याच्या आजूबाजूच्या लोकांची साथ त्याला खूप मौल्यवान ठरते. आपली दुखणी, आपला आजार कोणी समजून घेऊन सहानुभूती दाखवल्यावर किती दिलासा मिळतो ना? आजाराशी लढण्याची आशा निर्माण होते कारण आपल्या पाठीशी आपल्याला समजून घेणारी माणसं असतात.
पण माणूस आपल्याच शरीरामधील इंद्रियांमध्ये भेदभाव करेल असे वाटले नव्हते. या सर्व इंद्रियांना व शरीराला चालवणाऱया सगळय़ात महत्त्वाच्या इंद्रियाकडे तो कायम दुर्लक्ष करत आला आहे. त्याच एका इंद्रियाकडे आपुलकीने पहायचे सोडून त्याबद्दल मनामध्ये पूर्वग्रह बाळगतात आणि होत असलेले नुकसान बघून न बघितल्यासारखे करतात. साखर आणि गोड पदार्थ खाल्ले की शरीरातील रक्तामधील फलशर्कराचे (ग्लुकोज) प्रमाण वाढते ज्यामुळे मधुमेहासारखा दीर्घकालिक आजार होऊ शकतो. आता तो प्रत्यक्षात एखाद्या उघडय़ा जखमेसारखा इतरांना दिसत नाही, पण ज्याला असतो, त्याला त्याचा त्रास मात्र पूर्णपणे जाणवतो.
तसेच, शरीराच्या सर्वात दुर्लक्ष केल्या गेलेल्या इंद्रिय मेंदू/मनावरदेखील 5 महत्त्वाच्या संप्रेरकांचा (हार्मोन्स) प्रभाव आहे. त्या संप्रेरकांचे नाव डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, आणि एंडोर्फिन. प्रत्येक संप्रेरक विशिष्ट मानवी भावना व अनुभवाचा कारक आहे. मेहनतीने आणि एकाग्रतेने केलेल्या कार्याचे बक्षीस किंवा मोबदला मिळाला की माणसाला जो आनंद मिळतो, त्या भावनेचा कारक डोपामिन संप्रेरक आहे. ठरवलेली कोणतीही छोटी मोठी गोष्ट पार पडली की मेंदूमध्ये डोपामिनचे प्रमाण वाढते आणि माणसामध्ये यशस्वीतेची भावना जागते. म्हणून आपल्या आजूबाजूच्या माणसांना त्यांच्या रोजच्या छोटय़ा मोठय़ा यशासाठी प्रशंसा केली पाहिजे. डोपामिनची संख्या शरीरामध्ये कमी जास्त झाली झाली की त्याचा थेट परिणाम आपल्या किडनी, झोप, मनाची स्थिती आणि हृदयाच्या गतीवर पडू शकतो. त्यामुळे तात्पुरत्या वाटणाऱया निराशेला जर योग्य ती सोबत नाही मिळाली तर ते मनाबरोबरच शरीरासाठीही तेवढेच घातक आहे.
सेरोटोनिन हे शरीराच्या पाचकप्रणाली आणि मज्जासंस्थांमध्ये अधिक प्रमाणात सापडते. ते खूप महत्त्वाचे संप्रेरक आहे कारण त्याचा प्रभाव पूर्ण शरीरावर पडतो. नैसर्गिकरित्या मन स्थिर ठेवण्यामध्ये या संप्रेरकाचा खूप मोठा वाटा आहे. सेरोटोनिनमुळे नैराश्य आणि चिंताजनक आजारांचा प्रभाव कमी होतो, जखमा भरतात आणि हाडांचे आरोग्य योग्य राहायला मदत होते. मन, वातावरण आणि माणसे प्रसन्नतेने भरली असली की सेरोटोनिन समतोल राखण्यास मदत होते. म्हणूनच, आपण आपल्या आजूबाजूला सकारात्मक लोकांचा सहवास ठेवला पाहिजे आणि मनाला आनंद मिळेल अशा गोष्टी करत राहिल्या पाहिजेत.
ऑक्सिटोसिन संप्रेरक सामाजिक वर्तन आणि भावनांवर प्रभाव टाकते. त्यामुळे त्याचा प्रभाव शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरदेखील पडतो. समाजात नातेसंबंध निर्माण करण्याच्या माणसाच्या क्षमतेशी त्याचा थेट संबंध आहे. मानसिक उलथापालथ झाल्याने माणूस केवळ निराश होत नाही तर हे सर्व संप्रेरक त्याच्या शरीरामध्येसुद्धा थैमान घालत असतात.
एंडोर्फिन हे शरीरात तणाव आणि वेदना कमी करणारे रसायन आहे. एंडोर्फिनच्या अभावामुळे माणसाला डिप्रेशनसारख्या मानसिक रोगाशी सामना करायला लागू शकतो. त्याचबरोबर मायग्रेनसारखी तीव्र डोकेदुखी सहन करायला लागू शकते. एवढेच नव्हे तर शरीरातील या संप्रेरकांच्या प्रमाणाचा प्रभाव हा आपल्या प्रतिकारशक्तीवर देखील पडतो.
थोडक्मयात, माणसांच्या स्वभावातील बदलाला कारणीभूत फक्त त्याची वृत्ती नसते. कित्येक वेळेला नकळत चालू असलेल्या शरीराच्या आजारासमोर माणसाची मानसिक ताकत कमी पडते, ज्यामुळे त्याचे मानसिक आरोग्य कमी होते. मग याचा उपाय काय? एखाद्या माणसाला समाजाच्या बदलत्या रंगांमध्ये मिसळणे अवघड जात असेल तर त्याला आपण नावं ठेवणार का? त्याच्या मर्यादांची थट्टा करून त्याला स्वतःबद्दल वाईट वाटू देणार का?
जसे शरीराच्या विकारासाठी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे तसेच मानसिक रोगांसाठीदेखील योग्य मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मनासाठी हानिकारक असलेल्या वस्तू, आहार, संगत, साहित्य या सगळय़ांपासून लांब राहिले पाहिजे. एंडोर्फिनचे प्रमाण वाढविण्यासाठी शरीराला व्यायामाची सवय लावली पाहिजे. मनाला आणि शरीराला धडधाकट ठेवायचे असेल तर मानसिक डाएट पत्करणे अतिशय गरजेचे आहे. नकारात्मक लोकांपासून लांब राहून सकारात्मक शुभचिंतकांमध्ये वावरले पाहिजे. अति उष्ण, तिखट, तेलकट पदार्थांपासून लांब राहिले पाहिजे. सकारात्मक गाणी, चित्रपट, गोष्टींचा आस्वाद घेतला पाहिजे. या सगळय़ाबरोबरच आपल्या मनामध्येदेखील दुसऱयांच्या प्रति प्रेम, जिव्हाळा, सहानुभूती आणि सात्विक विचार विकसित केले पाहिजेत. या सगळय़ालाच म्हणतात ‘मनाचे डाएट’….!
-श्राव्या माधव कुलकर्णी








