ऑनलाईन टीम / परळी :
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना भाजपने संधी दिली. बहिणीला संधी न मिळाल्यामुळे पंकजा नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर दिल्लीतून परतल्यावर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली होती. मात्र, अद्यापही प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद म मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. याचाच प्रत्यय आज, भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये आला.
भाजपच्या वतीने बीडमध्ये जन आर्शिवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गोपीनाथ गडावरून याचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून गोपीनाथ गडावर ‘पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है’ अशी घोषणा देण्यात आल्या. या घोषणा ऐकून पंकजा मुंडे समर्थकांवर चांगल्याच संतापल्या. पंकजा मुंडे यांनी त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना झापले. त्या म्हणाल्या, ‘मी शिकवले आहे का तुम्हाला असे वागायला. मुंडे साहेब अमर रहे’ या घोषणा आम्ही रोखू शकत नाही. काय अंगार-भंगार घोषणा लावलीय? कसल्या फालतू घोषणा देत आहात? आपली संस्कृती अशी नाही. दुसऱया पक्षाचा कार्यक्रम चालू आहे का? मला शोभत नाही हे वागणे. जेवढय़ा उंचीची मी तेवढी लायकी ठेवा स्वतःची नाहीतर मला भेटायला यायचे नाही.’ असे खडसावले.
सोमवारी गोपीनाथ गडावरुन निघालेल्या जनआशीर्वाद यात्रेला भाजपचा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी खासदार प्रीतम मुंडे, राणाजगजितसिंह पाटील, आमदार नमिता मुंदडा, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण अण्णा पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, नितीन काळे, पदाधिकारी उपस्थित होते.








