वादी-प्रतिवादी राजी झाल्यानंतरच खटल्याचा निकाल : जनतेने लाभ घेण्याचे न्या. सी. एम. जोशी यांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
लोकअदालतमध्ये प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी न्यायालये प्रयत्न करत आहेत. लोकअदालतमध्ये कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याबद्दल कोणीही संशय बाळगू नये. कायद्याच्या चौकटीतच न्याय दिला जातो. वादी-प्रतिवादी हे दोघेही राजी झाल्यानंतरच खटल्याचा निकाल दिला जातो. तेव्हा लोकअदालतमध्ये खटला दाखल केल्यानंतर आपल्यावर अन्याय होईल, हा संशय कोणीही बाळगू नये, असे आवाहन मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. सी. एम. जोशी यांनी केले आहे.
लोकअदालतच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आवाहन केले. 12 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत भरविली जाणार आहे. संपूर्ण जिल्हय़ामधील न्यायालयांमध्ये ही लोकअदालत घेतली जाणार आहे. त्यामध्ये प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत अनेकांना या लोकअदालतींमधून न्याय मिळाला आहे. तेव्हा यापुढेही जे पक्षकार न्यायालयात येथील त्यांना आम्ही निश्चितच मदत करू, असे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे मध्यंतरी अनेक खटले प्रलंबित आहेत. लोकअदालत भरविणेही अडचणीचे झाले होते. मात्र, आता येणारी लोकअदालत निश्चितच यशस्वी होईल, असे त्यांनी सांगितले. या लोकअदालतीमध्ये बँक कर्ज प्रकरणे, धनादेश न वठणे, दिवाणी खटले, कौटुंबिक खटले, विम्यासंदर्भातील नुकसानभरपाईचे खटले निकालात काढले जाणार आहेत. विशेष करून दिवाणी खटले निकालावरही आमचा भर राहणार आहे. त्यासाठी पक्षकारांनी पुढे येणे गरजेचे आहे.
वाटणी दावे निकालात काढण्यासाठी प्रयत्न
पूर्वीपासून बऱयाच जणांची वाटणी झालेली नसते. केवळ तोंडी वाटणी होते. मात्र, त्यानंतर वाद निर्माण होतो आणि अनेक जण वाटणी हवी आहे. म्हणून न्यायालयात दावे दाखल करतात. एकत्र कुटुंब असल्यामुळे निश्चितच प्रत्येकाला वाटणी ही मिळालीच पाहिजे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेकांना वाटणी मिळणे कठीण जाते. अशा पक्षकारांनादेखील आम्ही विशेष करून खटला समेट करण्यासाठी प्रयत्न करत असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जन्म दाखला प्रकरणेही हाताळणार
जन्म तारखेमध्ये बऱयाचवेळा तफावत होते. त्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसतो. शाळांमध्ये जन्म तारीख आणि कागदपत्रातील नोंद यामध्ये तफावत असल्याने विविध कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. ही दुरुस्ती करताना किचकट प्रक्रिया असल्याने त्रास होतो. मात्र, आता लोकअदालतमध्ये जन्म दाखला बाबतीतही तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय देण्यात येईल, असे न्या. सी. एम. जोशी यांनी सांगितले.









