जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने जे कोरोनाचे नियम व अटी घातले आहेत त्यांचे पालन प्रत्येकाने करावे. कोणीही पालन करत नसेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी दिला आहे.
राज्य सरकारने मंगळवार दि. 27 रोजी रात्री 9 पासून 12 मे 2021 रोजी सकाळी 6 पर्यंत क्लोजडाऊनचा आदेश दिला आहे. या काळात निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक कार्यक्रम असोत किंवा व्यवसाय असोत किंवा इतर कोणतेही समारंभ असू देत, त्यावर राज्य सरकारने मार्गसूची जारी केली आहे. त्या मार्गसूचींची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे. जे कोणी अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
काटेकोर पालन आवश्यक
स्थानिक संस्था, संघ, व्यावसायिक यासह समस्त जनतेने हे नियम पाळले पाहिजे. कोरोना थोपवायचा असेल तर काटेकोर पालन हे केलेच पाहिजे. जर कोणीही त्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार भा.दं.वि. कलम 188 आणि कर्नाटक संसर्गजन्य रोगप्रतिबंधक कायदा 2020 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी दिला आहे.









