राकेश टिकैत यांच्याकडून 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. शनिवारी ‘चक्का जाम’नंतर दिल्ली-उत्तर प्रदेश गाझिपूर सीमेवर शेतकऱयांना संबोधित करताना त्यांनी ‘कोणत्याही दडपणाखाली आम्ही सरकारशी चर्चा करणार नाही, व्यासपीठ समतुल्य असेल तेव्हा चर्चा होईल’ असा इशारा देत पुन्हा एकदा आंदोलन चालूच ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले.
शेतकरी संघटनांनी शनिवारी देशभरात ‘चक्का जाम’ आंदोलन केले. या आंदोलनादयम्यान दिल्लीच्या सीमेवर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले. गाझिपूर सीमेवर आंदोलन करणाऱया टिकैत यांनी त्यांचा मार्ग रोखणाऱया पोलिसांसमोर हात जोडत ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणा दिल्या. तसेच आपण सर्वजण भाऊ-भाऊ आहोत, असेही ते पोलिसांना म्हणाले.
शेतकरी आणि जवान देशाचा कणा आहेत. शेतकरी आपल्या अधिकारांसाठी आंदोलन करत आहेत तर पोलीस आपले कर्तव्य निभावत आहेत. एकमेकांचे कोणाशीही शत्रूत्व नाही. हे जवान तर आपले भाऊ आहेत. त्यांच्या कर्तव्यनि÷sला आपण शतशः नमन करतो. शेतकऱयांच्या मागण्या तर केंद्र सरकारकडे आहेत. ज्यांनी तीन काळे कायदे आणून शेतकऱयांचा घात करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले हक्क मिळवल्याशिवाय शेतकरी दिल्लीच्या सीमेवरुन कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी परतणार नाहीत, असेही टिकैत यांनी म्हटले आहे.
भविष्यातील दिशा लवकरच जाहीर करणार
आम्ही नवीन कृषीविषयक कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली. त्यानंतर आम्ही पुढील योजना आखणार आहोत. एकतर सरकारने आमचे म्हणणे ऐकले पाहिजे, अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला. पुढील आंदोलन निश्चित करताना त्याला देशव्यापी स्वरुप देण्याचा प्रयत्नही राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकतर सरकारने नवीन कायदे मागे घ्यावेत, तसेच ‘एमएसपी’बाबत कायदा करावा, अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील. भविष्यात देशात यात्रा काढून देशभर आंदोलन केले जाईल. आमची अराजकीय चळवळ देशभरात होईल, अशी भूमिका टिकैत यांनी शेकडो शेतकऱयांसमोर स्पष्ट केली.









