माधव भांडारी यांची टीका, सावंतवाडीत सीएए समर्थनार्थ रॅली
वार्ताहर / सावंतवाडी:
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (एनआरसी) हे दोन्ही कायदे काँग्रेसच्या काळातील आहेत. काँग्रेसची सत्ता असताना बहुमताच्या जोरावर सहावेळा कायद्यात दुरुस्ती केली. त्यावेळी कुणी विरोध केला नाही. आता जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा कायदा कुठल्या एका राज्याचा नाही तर देशाचा आहे. कायदा नाकारणे अथवा विरोध करणे म्हणजे उन्मत्तपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री व मंत्र्यांनी संविधानाप्रमाणे शपथ घेतली आहे. त्यामुळे विरोध करणाऱया मंत्री, आमदार, खासदारांनी ही शपथ पुन्हा वाचावी, असे मत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी शहरात सोमवारी एनआरसी व सीएए कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर बॅ. नाथ पै सभागृहात नागरिकत्व संशोधन कायद्यावर चर्चासत्र झाले. त्यावेळी भंडारी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, अजित फाटक, जि. प. उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, संदेश गावडे, उमेश कोरगावकर उपस्थित होते.
एनआरसी हे काँग्रेसचे अपत्य
भंडारी पुढे म्हणाले, केवळ आसाममध्ये लागू असलेल्या ‘एनआरसी’ला काँग्रेसने 2003 व 2009 मध्ये सहमती दर्शविली होती. त्यावेळी एनआरसी, सीएए या दोन्ही कायद्यात दुरुस्ती झाली नाही. मात्र, आता दुरुस्ती झाली आणि कायदा अंमलात येताच विरोध सुरू झाला. खऱया अर्थाने हे अपत्य काँग्रेस व डाव्या पक्षांचे आहे. त्यांनी बोलण्यापुरताच हा कायदा अंमलात आणला होता का?
उद्धव ठाकरेंवर टीका!
हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशासाठी लागू आहे. ज्या मंत्री, आमदार, खासदारांनी संविधानाची शपथ घेतली, त्या शपथेतील प्रत्येक वाक्य अभ्यासा आणि नंतर या कायद्याबाबत बोला. राज्याचे मुख्यमंत्री हा कायदा नाकारत आहेत. म्हणजेच ते देशाचे संविधान नाकारत आहेत. हा त्यांचा उन्मत्तपणा आहे. त्यांनी या कायद्याचा अभ्यास करावा. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे कोणाचेही नुकसान होत नाही. या कायद्याचा योग्य तऱहेने अभ्यास करणे आवश्यक आहे. विरोधक चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवत आहेत, असेही भांडारी म्हणाले.
यावेळी अजित फाटक, राजन तेली यांनी सीएए दुरुस्ती बाहेरून आलेल्या व्यक्तींना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी आहे, असे असताना या कायद्याबाबत विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका केली.
यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे निशांत तोरसकर, स्वागत नाटेकर यांचा गौरव भांडारी यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन बाळ पुराणिक यांनी केले.
रॅलीला प्रतिसाद
‘सीएए’ व ‘एनआरसी’ समर्थनार्थ सावंतवाडी जगन्नाथराव भोसले उद्यान ते मिलाग्रीस हायस्कूल, बाजारपेठमार्गे संपूर्ण शहरातून तिरंगा झेंडा फडकवत शेकडो समर्थकांसह रॅली काढण्यात आली. यावेळी ‘वंदे मातरम् व भारत माता की जय’च्या घोषणांनी आंदोलकांनी शहर दणाणून सोडले. जवळपास एक कि.मी. अंतरापर्यंत लांबीचा तिरंगा करण्यात आला होता.
यावेळी माधव भांडारी, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सभापती मानसी धुरी, पुखराज पुरोहित, आनंद नेवगी, मनोज नाईक, श्यामकांत काणेकर, राजाराम चिपळूणकर, अरुण वझे, निशांत तोरसकर, स्वागत नाटेकर, बाळ पुराणिक, उमेश कोरगावकर, बंडय़ा कोरगावकर, उमेश साळगावकर, मुन्ना कोरगावकर, विजयेंद्र पेडणेकर, विराग मडकईकर, अखिलेश कोरगावकर, संजू शिरोडकर, दिलीप भालेकर, दीपाली भालेकर, ऍड. परिमल नाईक, उदय नाईक, डॉ. कौस्तुभ लेले, गणेश दीक्षित, धीरेंद्र म्हापसेकर, शहर अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ भांबुरे, सुधीर आडिवरेकर, वासुदेव परब, अजय गोंदावळे, केतन आजगावकर, सौ. नाटेकर, अजय सावंत, महेश पांचाळ उपस्थित होते.









