केंद्र सरकारची 3 महिन्यांसाठी योजना, 40 लाखांना दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या कामगारांना केंद्र सरकारकडून 3 महिन्यांसाठी त्यांच्या वेतनाच्या निम्मी रक्कम बेकारी भत्त्याच्या स्वरूपात दिली जाणार आहे. केंद्र सरकारने ही घोषणा शुक्रवारी केली. औद्योगिक क्षेत्रातील ज्या कामगारांच्या नोकऱया 31 मार्च नंतर गेल्या आहेत, तसेच ज्यांच्या नोकऱया 31 डिसेंबरपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तसेच ज्यांचे वेतन प्रतिमहिना 21 हजार रूपयांपर्यंत आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ 40 लाखांहून अधिक जणांना मिळण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर इच्छुकाला आधार क्रमांक द्यावा लागेल. 31 डिसेंबरनंतर या योजनेचा आढावा घेतला जाईल. आवश्यकता असल्यास त्यानंतरही ही योजना सुरू ठेवण्यात येईल. मात्र परिस्थितीनुसार अटी व नियम बदलण्यात येतील असे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने देण्यात आले. या योजनेला कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या बैठकीत संमती देण्यात आली. ही बैठक येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. सध्याच्या आव्हानात्मक काळात काही प्रमाणात आधार देण्याचे काम ही योजना करेल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.









