इस्लामपूर / प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील कामेरी येथील मदनेवस्ती जवळ उसाला लागलेल्या आगीत सुमारे चाळीस ते पन्नास एकर ऊस जळून खाक झाला. ही आग सकाळी आकराच्या सुमारास लागली. शार्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास सुरूवातीला एका फडाला आग लागली होती. यावेळी पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तरी देखील आगीने रोद्ररूप धारण केले. शेतकऱ्यांनी अग्निशमन दलास फोन लावला असता पाण्याने भरलेले बंब उपलब्ध नाहीत असे सांगण्यात आले. त्यामुळे ही आग लवकर आटोक्यात आणता आली नाही. या आगीत दहा ते पंधरा शेतकऱ्यांचा चाळीस ते पन्नास एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.