फसवणूक करून पैसा मिळविण्यासाठी काही काही लोक काय शक्कल लढवतील. याची कल्पना कित्येकदा येत नाही. अशाच एका व्यक्तीने सतत पाच वर्षे कोणतेही काम न करता वेतन तर मिळवलेच शिवाय पदोन्नतीही मिळविली. अशी घटना समोर आली आहे. रेडीट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या व्यक्तीने तसा दावा करून त्याचे प्रमाणही दिले आहे. या व्यक्तीला तिच्या कंपनीने जे काम दिले होते ते झटपट करण्याचा मार्ग या व्यक्तीने शोधून काढला.

कंपनीने दिलेले काम कॉम्प्युटरच्या एका कोड वर्डने आपोआप होते हे या व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्याने तशाप्रकारे ते काम करण्याचा सपाटा लावला. हे काम विनासायास करण्याची ही युक्ती त्याने अन्य कोणालाही सांगितले नाही. अशा प्रकारे सलग पाच वर्षे त्याने बिनबोभाट जवळजवळ काहीही काम न करता वेतन खाल्ले. संगणकच त्याचे काम करीत असल्याने ते अतिशय लवकर होत असे. साहजिकच झपाटय़ाने आणि अचूक काम करण्यासाठी त्याला पदोन्नतीही मिळाली. त्याला डेटा एंट्री ऑपरेटरचे काम मिळालेले होते. त्याला प्रति दिन एक इमेल येत होता. या इमेलमध्ये त्याला ऑर्डरशी संबंधित सर्व माहिती भरावयाची होती. आणि हा इमेल त्यांच्या सिस्टिममध्ये इन्स्टॉल करावयाचा होता. त्याची नाईट शिफ्ट होती. तथापि कंपनीने काटकसरीचे धोरण अवलंबिल्याने रात्रीच्या शिफ्टचे काम घरातून करण्याची मुभा मिळाली होती. या कर्मचाऱयाने हे काम करण्यासाठी डेव्हलपरच्या साहाय्याने कोडींग बनविले. या कोडींगच्या माध्यमातून हे काम संगणकच आपोआप करीत असे. त्यामुळे स्वतः कोणतेही काम न करता त्याला वेतन मिळत असे. त्यामुळे कामाच्या वेळेत तो सिनेमे बघत असे आणि शांतपणे झोपत असे. या काळात त्याला अन्य कंपन्यांकडूनही कामाच्या ऑफर्स आल्या होत्या. तथापि त्याने त्या ठोकरल्या. कारण काम न करता वेतन न मिळण्याची सोय तेथे नव्हती. मात्र ज्यावेळी कंपनीने नवा प्रोग्रॅम विकसित केला तेव्हा त्याचे कोडींग काम करेणासे झाले आणि त्याची नोकरीही गेली.









