जपानच्या यासुको तामाकी यांची अनोखी कामगिरी
जगातील सर्वात वयोवृद्ध ऑफिस मॅनेजर
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले नाव
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डकडून यासुको तमाकी यांना सर्वाधिक वयाच्या ऑफिस मॅनेजरचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यासुको यांचा जन्म 15 मे 1930 रोजी झाला होता. त्या सनको इंडस्ट्रीज या ट्रेडिंग कंपनीत 1956 पासून काम करत आहेत. ऑफिसच्या अन्य कर्मचाऱयांप्रमाणेच त्या आठवडयातील 5 दिवस काम करतात. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या शिफ्टमध्ये त्या काम करत आहेत.
90 व्या वर्षीही स्वतःचे काम कशाप्रकारे हाताळता अशी विचारणा यासुको यांना करण्यात आली होती. मी नेहमीच माझा जन्म इतरांच्या मदतीसाठी झाल्याचा विचार करते. याचमुळे मी माझ्या ऑफिसमध्ये चेअरमेन, मॅनेजर आणि सहकाऱयांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते, हाच माझ्या जीवनाचा नेहमीच उद्देश राहिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सनको इंडस्ट्रीजच्या स्थापनेच्या 8 वर्षांनी यासुको यांनी तेथे नोकरी सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्या ऑफिसमध्ये सेवा बजावत आहेत. त्या ऑफिसचे आर्थिक हिशेब हाताळतात. स्वतःचा वेळ वाया घालवू नका, वेळेचा सदुपयोग सर्वांसाठी आवश्यक आहे, असे यासुको स्वतःच्या सहकाऱयांना सांगत असतात. स्वतःच्या कामाच्या बळावर जगात नाव कमाविणाऱया यासुको निवृत्तीवर विश्वास ठेवत नाहीत. एक वर्ष संपते, तेव्हा दुसरे वर्ष सुरू होते. मी दरवर्षी स्वतःच्या जीवनाला अशाचप्रकारे काम करत घालवू इच्छिते असे त्यांनी म्हटले आहे.









