कामदेवाच्या अमोघ पराक्रमाचे स्मरण प्रद्युम्नाला करून देताना मायावती म्हणाली – प्रद्युम्ना तू स्वतः कामदेवाचा अवतार आहेस आणि तुझ्या मदनबाणांनी तू भल्याभल्यांचा पराभव केला आहेस. देवांचा राजा इंद्रदेव! रंभा, उर्वशी इत्यादी अप्सरा याच्या दासी. पण तुझ्या मदनबाणाने घायाळ झाल्यामुळे हा अहिल्येच्या पाठी लागला. तिच्याशी व्यभिचार केल्यामुळे याला गौतम ऋषींनी शाप दिला. त्यामुळे याला नपुसकत्व आले. तर अहिल्येला शिळा होऊन पडावे लागले. हा सारा तुझाच पराक्रम. देवाधीदेव महादेव यावर तू मदनबाण चालविलास तेव्हा हा शंकर भिल्लीणीच्या नेत्र कटाक्षाने घायाळ झाला आणि तिच्यापाठी फिरू लागला. सृष्टीकर्ता ब्रह्मदेव तुझ्या मदनबाणाने घायाळ होऊन आपल्या कन्येवरच अनुरक्त झाला. महातपस्वी पराशर धिवरकन्या मत्स्यगंधेच्या मोहात पडला आणि प्रतिसृष्टी निर्माण करण्याची शक्ती असणारा विश्वामित्र मेनकेच्या नादी लागला हा तुझाच पराक्रम नाही काय? रावण हा वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या कुळात याचा जन्म. शिवाचा अत्यंत श्रे÷ भक्त. इतका महापराक्रमी. पण तुझ्या मदनबाणाने तो घायाळ झाला. याने सीतेचे हरण केले आणि एका मानवाच्या म्हणजे श्रीरामाच्या हातून हा मरण पावला. कामदेवा! हा तुझाच पराक्रम! शुंभ आणि निशुंभ हे बंधू, काय कमी पराक्रमी होते? महषी कश्यपाचे हे पुत्र. यांनी मोठी तपश्चर्या केली. देवांकडून वरदाने मिळवली व नंतर देवलोकावरच स्वारी केली. इंद्राचा पराभव करून त्याचे सिंहासन बळकावले. तेव्हा सर्व देव दुर्गादेवीला शरण गेले. दुर्गा शुंभ निशुंभासमोर अत्यंत मोहक सुंदर रूप घेऊन प्रकट झाली आणि तू मदनबाणाने त्यांना घायाळ केलेस. शुंभ निशुंभ दोघांनाही दुर्गेबद्दल आकर्षण निर्माण झाले. दोघांनीही दुर्गेशी लग्न करण्याची इच्छा प्रकट केली. दुर्गेने अट घातली – तुमच्या दोघांच्या द्वंद्वयुद्धात जो जिंकेल त्याच्याशी मी विवाह करीन. दोघेही एकमेकाला भिडले. त्यांचे तुंबळ युद्ध झाले आणि दोघांनीही एकमेकाचा जीव घेतला. हा कामदेवा, तुझाच पराक्रम! सुंद आणि उपसुंद यांचेही तुला स्मरण करून देते. हे पराक्रमी दैत्य बंधू हिरण्यकश्यपूच्या वंशात जन्मले होते. यांनी विंध्याचल पर्वतावर खूप तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांनी वरदान दिले – तुम्ही आपापसात लढला नाहीत तर इतर कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही. या वरामुळे उन्मत्त झाल्याने सुंद उपसुंद हे त्रिभुवनात अत्याचार करू लागले. सर्व देव भयभीत होऊन ब्रह्मदेवाला शरण गेले व त्यांनी त्याच्या चरणी साकडे घातले. ब्रह्मदेवाने विश्वकर्म्याला एक अत्यंत सुंदर अप्सरा निर्माण करायला सांगितले. त्याप्रमाणे त्याने जी अप्सरा निर्माण केली तिचे तिळ न् तिळ अंग अद्भूत सुंदर होते. ही तिलोत्तमा अप्सरा सुंद उपसुंदासमोर प्रकट झाली आणि कामदेवा, आपण आपला पुष्पबाण चालवलात. तिलोत्तमेला पाहून दोन्ही भाऊ वेडे झाले व त्यांनी एकमेकांचा बळी घेतला. कामदेवा! हा तुझाच पराक्रम!
Ad. देवदत्त परुळेकर








