कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड एमआयडीसीतील एका उद्योजकाला त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारानेच फसवणूक करून तब्बल २० लाखाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघड़कीस आला. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित निखील मोहन कदम(वय २४,रा.बामणोली) या कामगारास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश सुनावला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुपवाड एमआयडीसीतील एस.आर.डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचे मालक सिध्दार्थ बाफना यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. कंपनीच्या मालकाने कामगाराकडे बॅकेत भरणा करण्यासाठी दिलेल्या रक्कमेतून वेळोवेळी काही रक्कम काढल्याचे तसेच बॅकेच्या स्लीपवर खाडाखोड करून २० लाख ८४ हजार ९१५ रुपये परस्पर लाटून् फसवणूक केल्याची तक्रार बाफना यांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी कामगारास अटक केली.








