प्रतिनिधी /पर्वरी
मालीम जेटी येथील कामगार शिब्रणराम याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या चौघा संशयित आरोपींना पर्वरी पोलिसांनी काल रात्री उशिरा अकट केली आहे. संतोष भगत (32), प्रदीप भगत (19), देवनारायण भगत (32) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असून ते सर्वजण छत्तीसगढ येथील आहेत. प्रमुख संशयित आरोपी सुमित कुजूर (19) याला पोलिसांनी रविवारी अटक केली होती. या घटनेसंबंधी सिताकांत परब यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार नोंदविली होती.
शिब्रणराम व त्याचे अन्य चौघे साथीदार मालीम जेटीवरील एका बोटीवर काम करीत होते. शुक्रवारी रात्री शिब्रणराम याचा वाढदिवस साजरा करीत असताना त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. रागाच्या भरात चौघांनी शिब्रणरामला मारहाण करून मांडवी नदीत फेकून दिले. त्याला वर येता आले नसल्याने त्यात त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना पोलिसांना सापडला. त्याचवेळी चौघांपैकी सुमित कुजूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर तिघेजण फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. सोमवारी रात्री उशिरा त्या तिघांना पकडण्यास पोलिसांना यश आले. पर्वरी पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहेत.









