प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल्स गेली दोन बंद आहेत. परंतु शासनाच्या नव्या आदेशानुसार हॉटेल्स सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. परंतु तिथून फक्त घरपोच सेवा देण्यात येणार आहे. घरपोच सेवा देण्यासाठी कामगार नसल्याने शासनाच्या आदेशाला खो बसत आहेत. त्यामुळे खवैय्यांच्या जिभेचे चोचले पुरवताना अडचणी येत आहेत. तर काही हॉटेल चालकांनी तर याचा फायदा उठवण्यास सुरूवात केली आहे.
लॉकडाऊनमध्ये सातारा शहरातील तसेच महामार्गावरील हॉटेल बंद ठेवण्यात आली होती. यामुळे व्यावसायिकांना मोठय़ा प्रमाणावर तोटा सहन करावा लागला. लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले असून या हॉटेल व्यवसायिकांना घरपोच सेवा देण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र कोरोनाची धास्ती अद्याप कायम आहे. हॉटेलमधून घरपोच सेवेद्वारे पदार्थ मिळू शकतात. परंतु कामगारही कमी झाल्याने ग्राहकांना याचा फटका बसत आहे.
शहरातील अनेक हॉटेलमध्ये परप्रांतीय कामगार आहेत. लॉकडाऊन अडकलेल्या या कामगारांना शासनाने ज्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवले गेले आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये कामगार नाही. तसेच कोरोनाच्या भितीने नवीन कामगारही लगेच मिळत नाही. त्यामुळे जेमतेम कामगारांच्या जिवावर हॉटेल सुरू केले आहे. परंतु घरपोच सेवा देताना अडचणी येवू लागल्या आहेत, असे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे.
सोशल मिडियावर जहिरात बाजी
घरपोच सेवा देण्याचा आदेश मिळताच हॉटेल मालक तयारीला लागले. हॉटेलमधील स्पशेल मेनू ची निवड केली आहे. कोणकोणत्या पदार्थाचा आस्वाद घेता येईल अशी पोस्ट बनवून सोशल मिडियावर पोस्ट केली जात आहे. त्यामुळे फोन नंबर दिला असून काहींनी या पोस्टवर बिर्याणी, तंदूर, यांचे फोटो लावले आहेत. ही पदार्थ पाहून खवैय्यांना चांगली भुरळ पडत आहे. तर काहींनी किती किलोमीटरपर्यंत सेवा दिली जाणार याचे रेटकार्डही टाकले असून लॉकडाऊनचा फायदा उठवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.








