ऑनलाईन टीम
अफगाणिस्तानातून पलायनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी काबूल विमानतळावर गर्दी केली आहे. यातच अमेरिका, ब्रिटनसह अन्य देशांनी या ठिकाणी आत्मघाती बॉम्बहल्ल्याची भीती आधीच व्यक्त केली होती. हे अखेर खरे ठरले. काल, गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १२ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
काबूल विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट (IS) ने स्वीकारली आहे. या संघटनेने काबूल विमानतळाच्या गर्दीच्या गेटवर स्फोट घडवलेल्या आत्मघातकी हल्लेखोराचा फोटोही प्रसिद्ध केला आहे. इस्लामिक स्टेटने आपल्या दाव्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या फोटोवरुन हा हल्ला करणारा तोच हल्लेखोर होता असे म्हटले आहे. आयएसने हल्लेखोर तालिबानच्या सुरक्षा चौक ओलांडण्यात यशस्वी झाला आणि तो स्फोट करण्यापूर्वी अमेरिकन सैनिक, अफगाणी नागरिकांच्या ५ मीटर (यार्ड) परिसरात गेला. त्यानंतर त्याने स्फोट घडवून आणला.
इस्लामिक स्टेटने केलेल्या आपल्या दाव्यात म्हटले आहे की, त्यांनी अमेरिकन सैनिक आणि अफगाण नागरिकांना लक्ष्य केले. या स्फोटावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी “हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे. त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,” असे म्हटले आहे.
Previous Articleकर्नाटकातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच `स्पॉटेड डिअर’चे दर्शन









