ऑनलाईन टीम / काबूल :
तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. येथिल स्थानिक नागरिक भयभीत झाले असून ते मोठय़ा संख्येने देश सोडत आहेत. तालिबानच्या दहशतीतून स्वतःची सूटका करण्यासाठी लोक कोणत्याही किंमतीत देशाबाहेर जाण्यास तयार झाले आहेत. बहुतांश लोकांनी काबूल विमानतळावर मोठय़ा संख्येने गर्दी जमा केली आहे. त्यातच आता काबूल एअरपोर्टवर नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे. पाणी आणि अन्नासाठी ते तळमळ आहेत. याचाच फायदा घेत या नागरिकांची लूट सुरु आहे. विमानतळाबाहेर खाण्या-पिण्याचे पदार्थ अव्वाच्या सव्वा किंमतीत विकल्या जात आहेत.
काबूल विमानतळावर पाण्याच्या बाटलीची किंमत 3000 रुपये आहे. तर प्लेटभर राईससाठी 7500 रुपये मोजावे लागत आहेत. इतकंच नाही तर दुकानदार अफगाणी करन्सी ऐवजी डॉलर्सची मागणी करत आहेत. दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटनचे सैनिक स्थानिक नागरिकांना मदत करत आहेत. परंतु प्रत्येक व्यक्तीपर्यंत खाण्या-पिण्याचे पदार्थ पोहोचवण्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- उपासमारीमुळे लहान मुले बेशुद्ध
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या विदेशी नागरिकांबरोबर स्थानिक नागरीक विमानतळाबाहेरील रांगेमध्ये उपाशी उभे आहेत. यामध्ये सर्वाधिक हाल हे लहान मुलांचे होत आहेत. उपासमारीमुळे काही मुले बेशुद्ध पडत आहेत. आता नागरीक हतबल झाले आहेत. काबूल विमानतळाबाहेर तब्बल 50 हजारांहून अधिक नागरिकांची गर्दी आहे. प्रचंड गर्दीमुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे, अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यापासून अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह अनेक देश आपल्या नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्यात गुंतले आहेत. 14 ऑगस्टपासून काबूल विमानतळावरून लोकांसाठी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.