काबूल / वृत्तसंस्था
तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर कब्जा केल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. तालिबानच्या धास्तीमुळे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी लोक देश सोडून पळून जाण्यासाठी धडपड करत आहेत. देशाबाहेर पडण्यासाठी शेकडो लोक काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर आल्यामुळे तणावपूर्ण स्थिती आहे. या गोंधळातच रविवारी विमानतळ परिसरात गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 7 अफगाणिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्रिटिश लष्कराने दिली आहे. इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर चेंगराचेंगरीचा प्रकार घडल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
सध्याच्या घडीला अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे. परिस्थितीला सुरक्षितरित्या हाताळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे, ते केले जात असल्याचे ब्रिटिश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितले आहे. तालिबानच्या राजवटीनंतर पळून जाण्यासाठी विमानतळ केंद्रबिंदू ठरत असल्यामुळे विमानतळावरील परिस्थिती गंभीर झाल्याचा दावा केला जात आहे.
तालिबानींसह ‘आयएस’ची दहशत
काबूल विमानतळ परिसरात इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवाद्यांनी हिंसाचार घडवल्याचे वृत्त आहे. तथापि काबुल विमानतळाच्या दिशेने होणारी गर्दी रोखण्यासाठी तालिबानींनीही तेथे हवेत गोळीबार केल्याचे समजते. काबूल विमानतळावरून निर्वासितांना घेऊन जाणाऱया विमानांवर हल्ले करण्याची इस्लामिक स्टेटच्या हस्तकांची योजना असल्याची माहिती मिळाली आहे. काबूल विमानतळाबाहेर तालिबानींचाही पहारा आहे. लोक देशाबाहेर जाऊ नयेत यासाठी तालिबानी सक्रिय झाले असून ते प्रत्येक नागरिकाची झडती घेत आहेत.
अमेरिकन दुतावासाचा इशारा
देशातील परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिकन दुतावासाने नागरिकांना एक नवा इशारा संदेश जारी केला आहे. अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधीकडून सूचना येईपर्यंत कोणीही काबूल विमानतळाच्या दिशेने येऊ नये. काबूलमध्ये इस्लामिक स्टेटकडूनही धोका वाढला असल्याचे त्यांनी आपल्या इशारा संदेशात म्हटले आहे.









