23 मोर्टार डागण्यात आले : हल्ल्यामध्ये 31 जण जखमी
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये शनिवारी सकाळी अनेक भागांमध्ये मोर्टार डागण्यात आले आहेत. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. हे मोर्टार दोन वाहनांमधून डागण्यात आले आहेत. कुठल्याही दहशतवादी संघटनेने आतापर्यंत या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
रॉकेट हल्ल्यापूर्वी चेहल सुतून आणि अजान कीमत भागात दोन स्फोटही झाले आहेत. जखमींना शेर-ए-नॉ भागातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला आपण केलेला नसल्याचा दावा तालिबानने केला आहे.
अमेरिका, अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात कतारमध्ये चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप कुठलाही ठोस निर्णय यात झालेला नाही. अफगाणिस्तानातील हिंसाचारात घट होईल अशी अपेक्षा अमेरिकेचे विदेशमंत्री माइक पॉम्पियो यांनी व्यक्त केली आहे.









