ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने सत्ता काबिज केल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानचा वाढता धोका लक्षात घेता नागरिक देश सोडत आहेत. भारतीय हवाई दलही तिथे अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी दोन सी-17 ग्लोबमास्टर विमानांमधून त्यांना एअरलिफ्ट करत आहे. यामधील एका विमानाने रविवारी रात्री उड्डाण केलं. सोमवारी सकाळी काही भारतीयांना घेऊन ते मायदेशी परतले. तर दुसऱ्या विमानाने काबूल विमानतळावर अमेरिकन सैनिकांच्या सुरक्षितेत दिल्लीसाठी उड्डाण केले आहे. या विमानामध्ये 120 जण आहेत. यामध्ये दूतावसातील कर्मचाऱ्यांसह आटीबीपीचे जवान आणि काही माध्यमांचे प्रतिनिधीदेखील आहेत. इतर भारतीयांनाही लवकरच मायदेशी आणण्यात येणार आहे.
अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी एअर इंडियाच्या दोन विमानांना स्टँडबाय मोडवर ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. मात्र, अफगाणिस्तानने हवाई हद्द बंद केल्याने एअर इंडियाला उड्डाणं रद्द करावी लागली. यानंतर हवाई दलाने हे काम हाती घेतले असून, दोन सी-17 ग्लोबमास्टर विमानांमधून अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात येत आहे. अफगाणिस्तानात अडकलेले सर्व भारतीय लवकरच मायदेशी परततील, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.









