प्रतिनिधी / शाहुवाडी
कापशी तालुका शाहुवाडी येथील आरव राकेश केसरे वय सात वर्ष पाच महीने या बालकास तीन ऑक्टोबर सांयकाळच्या दरम्यान अज्ञाताने फूस लावून पळवून नेले असल्याची नोंद शाहुवाडी पोलीसांत झाली असून या बाबत त्याचे वडील राकेश रंगराव केसरे यांनी अज्ञाताविरूध्द शाहुवाडी पोलीसांत फिर्याद दिली आहे. अतिरीक्त पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे, यांनी या ठिकाणाला भेट दिली.पोलीसांतून मिळालेल्या माहीती नुसार कापशी येथील आरव केसरे हा गावातीलच लक्ष्मण कदम याच्यां घराचे दारात खेळत होता. दरम्यान त्यास सांयकाळच्या वेळी अज्ञाताने त्यास फुस लावून पळवून नेले असल्याची नोंद झाली आहे.
सदर बालकाचे वर्णन रंग गोरा नाक सरळ उंची तीन फूट चेहरा उभट काळे डोळे अंगात पिवळ्या रंगाचा हापशर्ट काळया रंगाची हाप पॅन्ट पायात लाल रंगाचे प्लॅस्टिकचे बुट गळ्यात काळया दोऱ्यात सोन्याचे बदाम आहे. अशा वर्णनाचे बालक आढळल्यास तात्काळ शाहूवाडी पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी केले आहे. दरम्यान घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी तपास यंत्रणा गतीमान केली आहे.
तालुक्यात हळहळ
दरम्यान या बालकाच्या बेपत्ता होण्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून लवकरात लवकर या बालकाचा तपास लागावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत असल्याचेही चित्र आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात जिल्ह्यात लहान चिमुकल्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेने सर्वत्र चिंतातुर वातावरण बनले आहे.