ऑनलाईन टीम / पुणे :
आज आधुनिक युगात स्त्री पुरूषांच्याबरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. स्त्रियांच्या या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा. शिक्षणासाठी झटणा-या या सावित्रीची शाळा पुन्हा एकदा कातकरी पाड्यावर भरली. परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित असणा-या मुलांच्या मदतीला पुन्हा एकदा सावित्री आली.
केअर टेकर्स सोसायटीच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुळशी तालुक्यातील बेलावडे आणि दिसली या आदिवासी पाड्यांवरील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सावित्रीबाई फुलेंच्या वेशातील वर्षा शिंदे यांनी पाड्यावरील मुलांना बाराखडी शिकवली. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, नवा विष्णू मंडळाचे अध्यक्ष कुमार रेणुसे, विधीज्ञ सुफियान शेख, रणजित परदेशी, राजीव शिंदे उपस्थित होते. यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्याबरोबर खेळणी व खाऊचे वाटप देखील करण्यात आले.
कुमार शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत केली. त्यांच्यामुळेच आज महिलांना योग्य सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी कातकरी पाड्यावर आगळीवेगळी शाळा भरविण्यात आली. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कुमार शिंदे यांनी केले.
कार्यक्रमासाठी साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा, सुमित आगरवाल, सुशीलकुमार देशमुख, नयन शहा, गिझाल अन्सारी, अश्विनी मेहेंदळे यांचे विशेष सहकार्य लाभले.









