मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जनतेशी संवाद साधणार
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतानाच खोळंबलेल्या कामांना चालना देण्यासाठी येत्या 25 रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत दौरा करणार असून प्रशासन तुमच्या दारात या उपक्रमाच्या अंतर्गत गोव्याचे संपूर्ण प्रशासनच यावेळी काणकोणला येणार आहे. यावेळी शेळेर येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत.
मागच्या जवळपास दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे बरीच विकासकामे अडून राहिली. जनतेला त्यासंबंधीची परिस्थिती समजावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी मुख्य सचिव, महसूल सचिव, काणकोणचे आमदार असलेले उपसभापती इजिदोर फर्नांडिस, जिल्हाधिकारी, गोमेकॉचे डीन, आरोग्य संचालक, जिल्हा पंचायत सदस्य, सर्व सरपंच उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी आरोग्य, पंचायत, सार्वजनिक बांधकाम खाते, पशुसंवर्धन, समाजकल्याण, वीज, कृषी, महिला आणि बालकल्याण, मत्स्योद्योग, नागरी पुरवठा, प्रोव्होदोरिया या खात्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाच्या अंतर्गत विशेष सत्रामध्ये आतापर्यंत काणकोण तालुक्यात राबविण्यात आलेले लसीकरण, आधार कार्ड याविषयी चर्चा होणार असल्याची माहिती उपसभापती फर्नांडिस यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी दिली.









