प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण तालुक्यात पावसाचे थैमान चालूच असून 22 रोजी 4.5 इंच पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील भातशेती पूर्ण पाण्याखाली गेली असून साळेरी येथील पुलाजवळ दरड कोसळण्याची घटना घडली आहे. मोखर्ड येथे अर्धफोंड नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले असून नारळाच्या बागायतींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याची पातळी अकस्मात अडीच मीटरनी वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांनी तातडीने या भागाला भेट देऊन पाहणी केली आणि आपत्कालीन व्यवस्थापन समितीला त्याची कल्पना दिली. तालुक्यातील विशेषता नदीच्या काठावरील रहिवासी त्याचप्रमाणे किनारपट्टीवरील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.









