सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली, कदंबची प्रवासी वाहतूक सुरू, मात्र प्रवासी अत्यल्प, खासगी बससेवा बंद
प्रतिनिधी / काणकोण
कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन काही अंशी शिथील करून वाहतूक सेवा आणि अन्य सुविधा सुरू केल्यानंतर काणकोण तालुक्यात नागरिकांनी सर्वत्र एकच गर्दी केली. चावडीवरील बागायतदार भवन, पै खोत एंटरप्रायझेस, चावडीवरील भाजी मार्केट, स्वस्त धान्याची दुकाने, बसस्थानक आणि सरकारी कार्यालयांत असे चित्र दिसून आले. याभरात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली दिली.
यापूर्वी बँका आणि पतसंस्था जरी सुरू करण्यात आलेल्या असल्या, तरी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवूनच व्यवहार चालू असल्याचे दिसत आहे. मात्र सध्या जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. परत एकदा परप्रांतीय कामगार घोळक्याने एकत्र जमायला लागले असून ठिकठिकाणच्या बांधकामांना प्रारंभ झाला आहे. कोणी झाडे मारायला घेतली आहेत, तर कोणी संरक्षक भिंतीच्या कामाला प्रारंभ केला आहे. 17 पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलेला असून गोवा हरित विभागात असला, तरी त्याचा लाभ घेऊन बेफिकिरीने वागणे ही धोक्याची घंटा असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
शिकवण्यांना परवानगी नाकारली
दहावीच्या परीक्षा कधी होतील ते सांगता येत नाही. अभ्यास करून विद्यार्थी कंटाळले आहेत, तर काही विद्यार्थी शिकविलेल्या बऱयाच गोष्टी विसरून गेलेले आहेत. जे विद्यार्थी शिकविण्या घेत होते त्यांच्या विनंतीवरून शिकवण्या देणाऱयांनी उपजिल्हाधिकाऱयांकडे सदर वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची केलेली विनंती फेटाळण्यात आली आहे. मात्र बाजारात सध्या जी गर्दी उसळू लागली आहे ते कशाचे द्योतक आहे असा सवाल जो तो आता करायला लागला आहे. दुचाकीस्वार, चार चाकी वाहनांवरील निर्बंध हटविल्यानंतर विविध भागांमध्ये पोलीस कुमक ठेवून करण्यात येणारी तपासणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी या तालुक्यात मुक्त संचार चालू झाला आहे.
कदंबची प्रवासी वाहतूक सुरू
मडगाव ते पोळे त्याचबरोबर काणकोण तालुक्यातील खोतीगाव, खरेगाळी, तिर्वण, गावडोंगरी, आगोंद, खोल, सादोळशे या भागांतील कदंबची बसवाहतूक सुरू झाली आहे. मात्र एक किंवा दोन प्रवाशांना घेऊन या बसगाडया जात असल्याचे दिसत आहे. या तालुक्यातील खासगी बससेवा अद्याप सुरू झालेली नाही. टॅक्सी, मोटारसायकल पायलट, रिक्षाचालकांना मुभा दिलेली असली, तरी पर्यटकच नसल्यामुळे स्थानकावर येऊन तरी काय फायदा, असे मत एका मोटारसायकल पायलटने व्यक्त केले.
विविध भागांमध्ये मासेविक्री
चावडीवरील मासळी मार्केट जरी सुरू झालेले नसले, तरी चार रस्ता, पाळोळे, पैंगीण, पणसुले, कोकण रेल्वे पूल, वडामळ, माशे, आगोंद, साळेरी या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात मासेविक्री चालू आहे. घाऊक आणि किरकोळ विक्रीची दारूची दुकाने सुरू झालेली आहेत. बऱयाच भागांतील केशकर्तनालये सुरू झालेली आहेत. या तालुक्यातील हॉटेल, खानावळी, बार व रेस्टॉरंट वगळता सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू झाला आहे.









