तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वतंत्र मेळ, नव्या पिढीने देखील जपून ठेवलेली परंपरा
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यात आजपासून पारंपरिक शिमगोत्सवाला प्रारंभ होत आहे. या तालुक्यातील शिमगोत्सवाला नमनाने सुरुवात होऊन पौर्णिमेच्या दिवशी होळी दहनाने त्याची सांगता होत असते. तालुक्यातील प्रत्येक गावात स्वतंत्र पारंपरिक शिमग्याचे मेळ आहेत.
एकटय़ा लोलये पंचायतीमध्ये पोळेकार, पेडेकार, शेळीकार, आगसकार, कारयकार, ताणशीकार, वीरामेळ असे स्वतंत्र मेळ असून दशमीच्या दिवशी हे सर्व मेळ तामणे येथील अग्रासनी यांच्या घराजवळ एकत्र जमत असतात. गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा आजच्या पिढीने देखील जपून ठेवलेली असून या सर्व मेळांचे स्वतंत्र मांड आहेत. शिमगोत्सवासाठी कामधंद्यानिमित्त गावाबाहेर असलेले लोक आवर्जुन घरी येत असतात आणि या मेळांतील गडय़ांच्या स्वागतासाठी प्रत्येक जण सज्ज असतो.
पैंगीण येथील मांडपकारांचा मेळ हा दहा जणांचा मेळ म्हणून ओळखला जातो. वेलवाडा, पैंगीण येथील पारंपरिक मांडावर नमन घातल्यानंतर मेळातील गडे पंचायत क्षेत्रातील गाळये, खावट, पर्तगाळ, वेलवाडा, महालवाडा, कोळसर, मागदाळपर्यंत खेळायला जात असतात. या मेळाशिवाय वीरांचा मेळ असतो. या मेळाला देवाचा मेळ असेही संबोधतात. वीरांच्या मेळाला प्रथम मान असतो. हा मेळ पुढे गेल्यानंतरच मांडपकारांचा मेळ जात असतो.
काणकोण पालिका क्षेत्रातही स्वतंत्र मेळ
काणकोण नगरपालिका क्षेत्रात पाळोळे, नगर्से, किंदळे, पाटणे, देवाबाग या भागांत क्षत्रिय मराठा समाज, नाईक समाज, कोमरपंत समाज यांचे स्वतंत्र मेळ आहेत. तर गावडोंगरी, खोतीगाव, खोल, आगोंद, गालजीबाग या भागांत त्या त्या समाजाचे स्वतंत्र मेळ आहे. गावडोंगरी आणि खोतीगाव भागांतील मेळ उंच डोंगरावर असलेल्या दांडय़ावरून सुरू होत असतात. आदिवासी समाजाचे मूळ दैवत हे दांडय़ावर असते. त्याच ठिकाणी सर्व धार्मिक कार्यांना प्रारंभ होत असतो.
धनगरांचा मेळ
या तालुक्यात धनगर समाजाचे स्वतंत्र मेळ आहेत. बहुतेक मेळांमध्ये घुमट, शामेळ, शहनाई, सूर्त ही पारंपरिक वाद्ये वापरली जातात. मात्र धनगरांच्या मेळात ढोल-ताशांचा वापर केला जातो. काही खेळगडे पारंपरिक वेषभूषा, हातात तोणी, डोक्याला मुंडासे बांधून मेळाबरोबर असतात. पूर्वीच्या काळात नमीच्या दिवशी नमन घालून दशमीच्या दिवशी खेळायला घरातून बाहेर पडलेला खेळगडी पुनवेच्या दिवशी मांड मोडल्यानतंरच घरात प्रवेश करत असे. या काळात पायात चप्पल न घालता ते फिरायचे आणि शाकाहारी अन्न ग्रहण केले जायचे.
याच काळात श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवाच्या अवतार पुरुषाचा शिमगोत्सव आणि वीरामेळ होत असतो. श्री मल्लिकार्जुन देवची तरंगे वाडय़ावाडय़ावर जातात आणि कौल-प्रसाद घेण्यासाठी तसेच देवाला तळया देण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. शिमगोत्सवाची धामधूम संपल्यानंतर गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थाने, पैंगीण येथील श्री परशुराम मंदिर, कुळटी येथील श्री गुरू प्रदेशी मंदिराजवळ दिवजोत्सव आणि जत्रोत्सव होत असतो. हा संपूर्ण आठवडा या तालुक्यात शिमगा, दिवजोत्सव आणि जत्रोत्सवाने गजबजलेला असतो. मागची दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे या पारंपरिक शिमगोत्सवावर निर्बंध आले होते. यंदा मात्र दुप्पट उमेदीने सर्व वाडय़ांवरील खेळगडे शिमगोत्सवाच्या तयारीला लागले आहेत.









