गुरुवारपर्यंत जोरदार पाऊस : ऐन चतुर्थीत धुमशान शक्य
प्रतिनिधी /पणजी
पाऊस आता ऐन गणेश चतुर्थीमध्ये धुमशान घालणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या पत्रकानुसार येत्या गुरुवार 9 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान काणकोणला पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या 24 तासांत काणकोणमध्ये 7.5 इंच पाऊस पडला असून तेथील काही भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
येत्या बुधवारपर्यंत राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यता सर्वत्र जोरदार पाऊस झाला. काणकोणला पावसाने झोडपून काढले. काणकोणमध्ये 7.5 इंच एवढी विक्रमी नोंद झाली. मान्सून आजपासून आक्रमक होईल. जोरदार पावसाबरोबरच वाऱयाचा वेगही वाढणारा असेल. वाऱयाचा वेग ताशी 60 किमी व त्यापुढे जाईल. मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊ नये, असाही इशारा दिला आहे.
गेल्या 24 तासांत राज्यात पडलेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे : पेडणे 2 इंच, सांखळी 1.5, पणजी 1 , जुने गोवे पाऊण इंच, मुरगाव 1 इंच, दाबोळी अर्धा इंच, फोंडा अर्धा इंच, केपे 1.5 इंच, सांगे 1 इंच, काणकोण 7.5 इंच.
पाऊस पुन्हा अतिरिक्त ठरला
कालपर्यंत पडलेला पाऊस राज्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 1 इंच कमीच होता. परंतु गेल्या 24 तासांत पडलेल्या पावसाने वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो दोन इंच अतिरिक्त ठरला आहे. साधारणपणे आतापर्यंत 109 इंंच एवढा सरासरी पाऊस झालेला आहे.









