मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौऱयाची सांगता, विविध पर्यटनस्थळांची पाहणी
प्रतिनिधी /काणकोण
निसर्गाने काणकोण तालुक्यात सुंदर किनारे, डेंगर, धबधबे, मंदिरे, चर्चेससारखे वैभव दिलेले आहे. त्यांचे सौंदय पाहण्यासाठी खास पणजीहून बसेसची सोय केली जाईल. इको-टुरिझम, कृषी पर्यटन, साहसी उपक्रम यासारखे विषय पर्यटन खात्यामार्फत राबविल्यास सभापती रमेश तवडकर यांच्या ‘व्हिजन काणकोण’ची पूर्ती होईल आणि निश्चितच त्याचा लाभ काणकोणच्या जनतेला होईल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी श्रीस्थळच्या सरकारी विश्रामधामात आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेला सभापती रमेश तवडकर, पर्यटन सचिव संजीव आहुजा, संचालक निखील देसाई आणि अन्य उपस्थित होते. पर्यटनमंत्री काणकोण मतदारसंघाचा दोन दिवसांचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. पर्यटन वाढीकरिता तीन टप्प्यांचा नियोजनबद्ध असा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात छोटे, मध्यम आणि दीर्घ सत्र अशी विभागणी असेल. काणकोणचा बटरफ्लाय किनारा, हनिमून बीच, पोळे, तळपण, आगोंद, पाळोळे, राजबाग, होवरे या किनाऱयांवर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील. पर्यटकांकरिता माहिती केंद्राची व्यवस्था करण्याबरोबर सर्व किनाऱयांवर फलक लावले जातील, अशी माहिती खंवटे यांनी दिली.
त्याचबरोबर पर्यटकांच्या माहितीसाठी खास ऍप तयार केले जाईल, पोळे चेकनाक्यावरून गोव्यात येणाऱया प्रवाशांसाठी खास प्रवेशद्वाराची उभारणी करतानाच त्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात येणार आहे, असे पर्यटनमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. हा सर्व खर्च पर्यटन खात्यामार्फत करण्यात येणार असून काणकोण मतदारसंघाला वेगळा आयाम देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदा संघातील कुसके, बामणबुडा हे धबधबे, चापोली व गावणे धरण परिसर, सर्व किनारे यांची या दौऱयात सभापती आणि पर्यटन खात्यामधील प्रमुख अधिकाऱयांसमवेत मंत्री खंवटे यांनी पाहणी केली.









