प्रतिनिधी/काणकोण
काणकोण तालुक्यातील गालजीबाग, पाटणे, पाळोळे, कोळंब, आगोंद या किनारी भागात वादळाचा जबदरस्त फटका बसला असून बऱयाच ठिकाणी भरतीरेषा पार करून पाणी वर आले. आगोंद येथे समुद्राला आलेल्या भरतीमुळे किनाऱयावरील घरांत पाणी घुसले. किनाऱयावरील काही हंगामी तंबू वाऱयाने मोडून गेले आहेत.
पाळोळे किनाऱयावर प्रवेशद्वारापासून वाहन तळापर्यंत पाणी पोहोचले, तर गालजीबाग किनाऱयावर भरतीरेषा ओलांडून पाणी आत शिरले. मात्र कोठेच सुदैवाने वित्तहानी किंवा मनुष्यहानी झालेली नाही, अशी माहिती काणकोणचे उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई, मामलेदार विमोद दलाल यांनी दिली. वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार विशेषता किनारी भागांकडे अधिक लक्ष देण्यात यावे अशी सूचना उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी काणकोणच्या उपजिल्हाधिकारी तसेच मामलेदार कार्यालयांना दिली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकारी प्रभुदेसाई आणि मादलेदार दलाल यांनी किनारी भागाची पाहणी केली. उपसभापती फर्नांडिस यांनी गालजीबाग, पाळोळे, पाटणे, आगोंद या भागांची पाहणी केली. कोठेच अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र किनारपट्टीवरील लोकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. दरम्यान, काणकोणच्या मामलेदार कार्यालयातील नियंत्रण कक्ष, अग्निशामक दलाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.









