मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उदगार
प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण हा कृषीप्रधान भाग असून या ठिकाणी तयार होणारी भाजी गोव्याची अर्धी भूक भागवू शकते. मुक्तीनंतर 60 वर्षांनी देखील गोव्याला दूध, भाजी, अंडी, चिकनसारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यावर अवलंबून राहावे लागते. यापुढे ही परिस्थिती बदलण्यासाठी गोव्यातील युवकांना प्रोत्साहित केले जाईल. त्यांना सर्व प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. यापुढे गोव्यातील नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहणार नाहीत. एकही दिव्यांग व्यक्ती उपाशी राहणार नाही आणि सरकारी योजनांपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक विकास हे या सरकारचे ध्येय असल्याचे काणकोणच्या कृषी भवनाची पायाभरणी केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
या समारंभाला उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी आमदार विजय पै खोत, नगराध्यक्षा नीतू देसाई, नगरसेविका छाया कोमरपंत, कृषी संचालक नेविल आफोंसो, विभागीय कृषी अधिकारी कविराज ना. गावकर उपस्थित होते. कोविड-19 च्या महामारीच्या काळात आर्थिक टंचाई असून देखील सरकारने अनेक प्रकल्प चालीस लावले आणि काणकोणचा कृषी भवनाचा प्रकल्प देखील पैशांमुळे खोळंबून राहणार नाही. दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असे सावंत यांनी सांगितले.
धनाडय़ लोक घेतात गरीबांच्या योजनांचा लाभ
बऱयाच व्यक्ती स्वतः मोठमोठय़ा फ्लॅटमध्ये राहतात, आलिशान गाडय़ा घेऊन फिरतात आणि बीपीएलसाठीच्या योजनांचा लाभ घेतात. अशाने खरे गरजू लोक बाजूला पडतात. यापुढे अशा प्रकारांची कसून चौकशी केली जाईल. त्यासाठी गोव्यात 200 अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले असून दर शनिवारी हे अधिकारी प्रत्येक पंचायतीला भेट देतील. तेथील पंच, देवस्थान प्रतिनिधी, चर्च प्रतिनिधी, स्वयंसाहाय्य गटांना भेटतील. सरकारच्या योजना सर्व थरांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे प्रतिनिधी करतील, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही विरोधी शक्ती ज्या वस्तू पुरवितात त्यापासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
तीन टप्प्यात प्रकल्प पूर्ण होणार : कवळेकर
काणकोणचे नियोजित कृषी भवन काणकोणच्या शेतकऱयांच्या भल्यासाठी उभारण्यात येत असून ही काणकोण मतदारसंघातील काळाची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी व्यक्त केले. या प्रकल्पावर पहिल्या टप्प्यात 3 कोटी 6 लाख रु. खर्च होणार असून एकूण तीन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
24 वर्षे प्रकल्प रखडणे शरमेची गोष्ट : फर्नांडिस
1996 साली कृषी भवनासाठी तत्कालीन मंत्री स्व. संजय बांदेकर यांच्या कारकिर्दीत ही जागा संपादित केली होती. मागच्या 24 वर्षांत या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ न होणे ही काणकोण मतदारसंघासाठी शरमेची गोष्ट आहे. याकामी तत्कालीन आमदार जरी कमी पडले असले, तरी येथील जनता का जागरूक झाली नाही, असा सवाल उपसभापती फर्नांडिस यांनी केला. ज्या दिवशी आपण सरकार पक्षात प्रवेश केला त्याचदिवशी या प्रकल्पाच्या मागे लागलो. यासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱयांचे आपल्याला खूप सहकार्य मिळाले. या कृषी भवनामध्ये केवळ काणकोणच्याच शेतकऱयांना प्रवेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
कृषी संचालक नेविल आफोंसो यांनी प्रकल्पासंबधी माहिती दिली. स्थानिक नगरसेविका कोमरपंत यांनी स्वागत केले. नविना विनय तुबकी, दीक्षा नाईक, सौरभ कामत यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. नगराध्यक्षा देसाई यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले. विभागीय कृषी अधिकारी गावकर यांनी आभार मानले.
माजी कृषिमंत्री रमेश तवडकर अनुपस्थित
माजी कृषिमंत्री रमेश तवडकर या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. स्वतः पाच वर्षे कृषिमंत्री असताना या प्रकल्पाची फाईल पुढे नेण्यात ते बरेच कमी पडले व हे श्रेय शेवटी इजिदोर फर्नांडिस घेऊन गेले अशा प्रतिक्रिया उपस्थितांमधून व्यक्त होताना ऐकायला मिळत होत्या.









