म्हापसा वीज कार्यालयावर नेला मोर्चा : सहाय्यक अभियंत्याला धरले धारेवर
प्रतिनिधी / म्हापसा
मे महिन्याचा उकाडा त्यात गर्मी आणि रात्री 12 वा. वीजपुरवठा खंडित झाल्याने गर्मीत वाढ त्यात डास अशा परिस्थितीत म्हापसा वीजपुरवठा कार्यालयात फोन केल्यास फोनही लागत नाही. तेथे जाब विचारल्यास फिडर दुरुस्ती काम सुरू आहे येईल दहा मिनिटात. घरात लहान मुलांचे गर्मीच्या उकाडय़ात रडणे अशा परस्थितीत वेर्ला काणका गावातील नागरिकांनी सोमवारची रात्र काढली. पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान रागाने काणका बांध गावातील नागरिकांनी म्हापसा वीज पुरवठा खात्यावर धाव घेतली असता तेथील अभियंता वर्गांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वातावरण अधिक तापले.
अखेर याविरुद्ध दुपारी काणका गावातील नागरिकांनी म्हापसा वीज पुरवठा खात्यावर आपला मोर्चा नेऊन कार्यकारी अभियंता प्रदीप नार्वेकर यांना जाब विचारला व सहाय्यक अभियंता रामदास सालेलकर नागरिकांशी उद्धटपणे वागतात अशी तक्रारही केली. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन अशी परिस्थिती पुन्हा येणार नाही असे ठोस आश्वासन कार्यकारी अभियंता श्री. नार्वेकर यांनी दिल्यावर सर्व ग्रामस्थ माघारी फिरले. गेल्या सात आठ दिवसापासून वेर्ला काणका पंचायत क्षेत्रात वीजेचा लपंडाव होत असून सोमवारी रात्री 12 वा. गेलेली वीज सकाळी 10 वा. आल्याने वीजगुल्ल झाल्याने काणका बांध येथील नागरिक एकत्रित आले व पहाटे 2.30 वा. सर्वांनी म्हापसा वीजपुरवठा खात्यावर आपला मोर्चा नेला व तेथे उपस्थित कर्मचारी वर्गांना जाब विचारला असता त्यांनी फिडरवर फॉल्ट असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता येईल नंतर येईल या प्रतिक्षेत सकाळी 5 वाजेपर्यंत वाट पाहीली. मात्र वीजपुरवठा सुरळीत झालाच नाही. फिडर कधी दुरुस्त होणार हे सांगता येत नाही आणि आम्हाला बोलण्याचा अधिकारही नाही असे तेथील कर्मचारी वर्गांनी स्पष्ट केल्याने सर्वांनी सकाळी 10 वा. सहाय्यक अभियंत्यांना भेटण्याचे ठरविले व सर्वजण आपल्या घरी परतले.
अभियंत्याकडून ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे
सकाळी 10 वा. काणका बांध येथील ग्रामस्थ पुन्हा जमा झाले व त्यांनी आपला मोर्चा म्हापसा वीज पुरवठा खात्यात नेला असता त्यांना डय़ुटीवर कार्यकारी अभियंता श्री सालेलकर भेटले असता त्यांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. फिडरवर समस्या आहे रात्रीच्यावेळी ती आमची डय़ुटी नाही. तुम्ही मला काही विचारू नका, आपली तक्रार कुणाकडे करतात त्यांच्याकडे करा अशी उद्धटपणे बोलणी केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. एक तर वीज नाही त्याउलट अभियंत्या वर्गाकडून उडवाउडवीची उत्तरे यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. व हे प्रकरण हातघाईवर येणार हे समजताच ग्रामस्थांनी अभियंता सालेलकर यांना शांत करण्याचा प्रय्तन केला मात्र ते बोलण्याच्या परिस्थितीतच नव्हते. त्याउलट तुम्ही माझे काय करणार. पाहिजे ते करा अशी दमदाटी त्यांनी ग्रामस्थांना दिली. संतप्त ग्रामस्थ व अभियंता यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली. अखेर ग्रामस्थांनी दुपारी कार्यकारी अभियंता नार्वेकर यांची भेट घेण्याचे ठरविले व माघारी फिरले.
ग्रामस्थ कार्यकारी अभियंत्यांना भेटले
दुपारी सर्व ग्रामस्थांनी अक्झीकेटीव्ह इंजिनिअर प्रदीप नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना घटनेची सर्व माहिती दिली. काणका मध्येच वीजेचा पुन्हा पुन्हा लपंडाव का? असा सवाल शिष्टमंडळाने केला. सोमवारी रात्री ते मंगळवार सकाळी 9 वाजेपर्यंत आम्हाला वीज नाही. याचे कारण काय? काणका बांध या गावावरच रोष का? येथीलच फिडर नादुरुस्त पुन्हा पुन्हा कसे होतात. गर्मीच्या दिवसात प्रसिद्धी न करता रविवारी वीज पुरवठा खंडित कसा केला. अभियंता सालेलकर उडवाउडवीची उत्तरे आम्हाला का देतात. त्यांना नागरिकांशी कसे बोलावे याचे भान नाही. रात्र काळोखात गर्मीच्या दिवसात आणि डास यांच्यात काढणे योग्य आहे काय? असे विविध प्रश्न करून याचा जाब विचारला.
काणका बांध येथे वीज पुरवठा खंडित झाला आम्ही शोध घेण्यास सुरुवात केली असता पर्राच्या बाजूने फॉल्ट असल्याचे आढळून आले मात्र तेथे सर्वकाही बरोबर होते. नंतर काणका वेर्ला बाजूने पाहिले असता काणका भागात असल्याचे आढळून आले. रात्रभर पेट्रोलींग केले मात्र फॉल्ट लागला नाही. नंतर आम्ही म्हापसा स्टेशनवर घातला. तोपर्यंत सकाळ झाली. लोकांना त्रास झाले हे आपल्यास माहीत आहे अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आम्ही काळजी घेणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप नार्वेकर यांनी सांगितले. एका पॅनलवर दोन लोड घालतात स्वतंत्र फिडरवर आम्ही काम केले. आता वेर्ला काणकाची लाईन फिडर म्हापसा फिडरवर घालण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सहाय्यक अभियंता श्री. सालेलकर धारेवर
सकाळी उडवाउडवीची उत्तरे देणारे सहाय्यक अभियंता रामदास सालेलकर यांना बोलावून घ्या अशा एकच मागणीवर ग्रामस्थांनी जोर धरला. त्यानंतर त्यांना कार्यकारी अभियंता नार्वेकर यांनी बोलावून घेतले व ग्रामस्थांपुढे नम्रतेने बोलावे असे सूचित केले. यावेळी ग्रामस्थांनी रामदास सालेलकर यांना बरेच धारेवर धरले. त्यावर त्यांनी आपली चूक झाली मला माफ करा असे सांगून ग्रामस्थांची माफी मागितली. आम्ही असे आलो म्हणून आम्ही साधे आहेत असे समजू नका. आम्हीही अधिकारीवर्ग, उच्च न्यायालयाचे वकील आहोत. आम्ही सरकारी नोकर आहोत असे सूचित करून ग्रामस्थांनी मंत्री मायकल लोबोच्या पावलावर नाचू नका आणि ग्रामस्थांना काहीही बोलू नका असा दमही ग्रामस्थांनी अभियंता सालेलकर यांना दिला. यावेळी अभियंता दिपक नार्वेकर उपस्थित होते.
यावेळी स्थानिक पंच बाळा नाईक, शिवदत्त मूंज, अविनाश किनळेकर, प्रवीण च्यारी, प्रशांत रेडकर, बाळा परमेकर, पीटर डिसोझा, अभय च्यारी, पुंडलिक किनळेकर, शैलेश कोरगांवकर, सुहास मांद्रेकर, आनंद कांबळी, पांडुरंग गडेकर, स्नेहा बडीगर, मंगेश पंडित, महाबळेश्वर बडीगर, उदय सावंत, विठ्ठल वेंगुर्लेकर, अमय कोरगावकर उपस्थित होते.
दरम्यान विजेच्या लपंडावामुळे काणका बांध येथील महाबळेश्वर व स्नेहा बडीगर यांनी आपल्या सहा महिन्याच्या तान्हुल्याला गर्मीत पहाटे सहा वाजेपर्यंत रस्त्यावर आपल्या हाताने फिरत झोजविले त्याची आठवण त्यांनी कार्यकर्ते अभियंत्याशी बोलताना करून दाखविली. ग्रामस्थांनीही वीजेच्या लंपडावामुळे चीड व्यक्त करीत या घटनेची यावेळी आठवण करून दिली. काणकाची लाईन म्हापसा फिडरवर घालण्यात येईल या कार्यकारी अभियंत्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थ माघारी फिरले.









