पाच तोळय़ाचे दागिने लंपास : कुलूप तोडून मंदिरात प्रवेश
खानापूर /वार्ताहर
काटगाळी, ता. खानापूर येथील गावच्या मध्यभागी असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात चोरटय़ांनी धाडसी चोरी केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. चोरटय़ांनी मंदिराच्या समोरील दरवाजा कटरने तोडून देवीच्या अंगावरील जवळपास पाच तोळे सोन्याचे दागिने व चांदीसह मंदिरात असलेले सीसीटीव्हीचे इन्व्हर्टरही लंपास केले आहे. त्यामुळे आता देवही सुरक्षित नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काटगाळीत मागील महिन्यात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री लक्ष्मीदेवी मंदिराचा जीर्णोद्धार करून उत्सवही साजरा करण्यात आला. उत्सवादरम्यान अनेक भाविकांनी दागिन्यांसह रोख रक्कमही मंदिरासाठी देणगी दिली आहे. देवीला अर्पण केलेले दागिने पंच कमिटीने मूर्तीला परिधान केले होते. परंतु यावर चोरटय़ांनी नजर ठेवून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजा कटरने तोडून मंदिरात प्रवेश केला व देवीच्या अंगावर असलेला एक तोळा सोन्याचा नेकलेस, दीड तोळा बोरमाळ, दीड तोळा गंठण व मनी मंगळसूत्र असा जवळपास पाच तोळय़ांचा ऐवज लंपास केला आहे. शिवाय चांदीचा छल्ला व किरीटही चोरटय़ांनी लांबविले आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आपली छबी उमटू नये, यासाठी चोरटय़ांनी इन्व्हर्टर सोबत घेऊन पोबारा केला आहे.
मंदिरात चोरी झाल्याची घटना सकाळी सात वाजता पूजेसाठी येणाऱया भाविकांच्या निदर्शनाला आली. त्यानंतर गावात ही वार्ता पसरली. तातडीने खानापूर पोलीस स्थानकाला ग्राम पंचायतीने चोरी प्रकरणाची माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक तसेच गुन्हे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱयांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. दरम्यान, बेळगावहून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. परंतु श्वानपथकाला तातडीने चोरटय़ांचा तपास लावण्यास अडथळा आला.
वास्तविक सदर मंदिर गावच्या मध्यभागी आहे. चौफेर लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात आहे. अशा ठिकाणीही मंदिरात कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून चोरटय़ांनी प्रवेश केला. यावेळी कुणालाही याची कुणकुण कशी काय लागली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.









