काजू बियांचा दर कोसळला : व्यापारी माल उचलत नसल्याने समस्या : काजूचा दर आठवडय़ाभरात निश्चित : कृषीमंत्री
प्रतिनिधी / मडगाव
काणकोणपासून पेडणे व सांगेपासून ते वाळपईपर्यंत गोव्यात काजूचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. अनेकांचे वर्षभराचे नियोजन हे केवळ काजू पीकावर अवलंबून असते. मात्र, यंदा केंरोना व्हायरसमुळे काजू बागायतदार संकटात सापडले आहेत. काजू बियांचा दर यंदा सुरुवातीला 136 रुपये प्रति किलो होता, तो आत्ता कोसळला असून 95 रुपये प्रति किलो झालेला आहे. घाऊक व्यापारी तसेच गोवा बागायतदार सारखी संस्था सुद्धा माल उचलत नसल्याने शेतकऱयांवर मोठे संकट कोसळले आहे.
गोव्याच्या अनेक भागात काजू पीक हे महत्वाचे मानले जाते. अनेकांचे संसार त्यावर अवलंबून असतात. परंतु, यंदा काजू पीक तयार असताना देखील त्याची उचल होत नसल्याने काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत. गोव्यातील काजू फॅक्टरी सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्याचबरोबर काजूची निर्यात देखील होत नाही. लॉकडाऊन कधी संपणार हे सध्या कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्या मालाची उचल होईल की नाही या विवंचनेत काजू बागायतदार सापडलेला आहे.
आठवडय़ाभरात दर निश्चित : कृषीमंत्री
सध्या चालू असलेल्या ‘कोविड 19’च्या लॉकडाऊन मुळे गोव्यातील काजू बागायतदार, पीक तयार असून घाऊक व्यापारी उचलत नसल्याने हवालदिल झाले आहेत. कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी काल सोमवारी गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांच्याशी चर्चा करून चालू आठवडय़ात दर निश्चित केला जाईल, अशी माहिती दिली आहे.
लॉकडाऊनच्या काळात काजू बागायतदारांकडून काजू बिया कशा उचलायचे याचे नियोजन चालू आहे व त्यासंदर्भात खात्यामार्फत रितसर माहिती शेतकऱयांपर्यंत पोहचवली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. कवळेकर म्हणाले. सध्या काजूचा हंगाम चालू असून काजू बिया उन्हात राहिल्या तरीही त्यात शेतकऱयांचे नुकसान होते. तसेच ऐन हंगामात लॉकडाऊन आल्यामुळे काजू बागायतदार व शेतकरी चिंतेत आहेत याची पूर्ण जाणीव आपल्याला आहे व यासाठी सरकार उपाययोजना आखत असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱयांचे कमीत कमी नुकसान याही परिस्थितीत होणार याकडे आपले लक्ष राहील व सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर शेवटी म्हणाले.
गोवा कृषी पणन मंडळाने पुढाकार घ्यावा
काजू हे नगदी पीक. कित्येक छोटे काजू बागायतदार वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी काजू पिकावर अवलंबून असतात. या वषी एकंदर काजूचे पीक कमी आहे. कोरोना संसर्गामुळे सर्व खरेदी व्यवहार ठप्प झाले आहेत. काजू खरेदी बंद असल्यामुळे या पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या लोकांचे हाल झाले आहेत. अशा वेळेला गोवा कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने सहकारी संस्था आणि नोंदणीकृत काजू व्यापाऱयांमार्फत फिरत्या वाहनातून गावपातळीवर सामाजिक विलगीकरण पाळून काजू खरेदी करणे शक्मय होते, असे माजी मंत्री रमेश तवडकर यांनी म्हटले आहे.
गोवा कृषी पणन मंडळाकडे मार्केट सेसमधून जमा झालेले काही कोटी रुपये कायम ठेवीमध्ये जमा आहेत. हा सेस बागायतदारांच्या शेत मालाच्या विक्रीतून जमा झालेला आहे. आजच्या निर्वाणीच्या वेळेला असा निधी वापरून शेतकरी बागायतदारांना दिलासा अपेक्षित आहे. आज आपण गावागावातून प्रभावीपणे दूध संकलन करू शकतो तर काजू का नाही करू शकत, असा सवाल श्री. तवडकर यांनी उपस्थित केला आहे.
गावागावातून माल उचलण्यासाठी आपण आपले प्रतिनिधी असे निवडले पाहिजे ज्यांना या विषयी आस्था व कणव असली पाहिजे. सामान्य शेतकरी बागायतदार टिकला तरच गोवा कृषी पणन मंडळाची भरभराट होईल असे श्री. तवडकर यांनी म्हटले आहे.