तिळारीची क्षमता वाढविणार
प्रतिनिधी /पणजी
धारबांदोडा तालुक्यात शेती, बागायतीसाठी असलेली पाण्याची मोठी मागणी लक्षात घेऊन लवकरच काजूमळ आणि तातोडी येथे लघु धरणे बांधण्यात येणार आहेत. त्याशिवाय सत्तरी तालुक्यात चरावणे धरणाचे कामही लवकरच पूर्णत्वास नेण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.
पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात शेतीप्रधान असे सात तालुके असून सुमारे 70 हजार कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. त्या सर्वांना पाणी मिळायला हवे या उद्देशाने गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही राज्यातील विविध भागांमध्ये दौरा केला. त्यावेळी खास करून केपे व सांगे तालुक्यात शेतकऱयांना पाणी मिळत नसल्याचे दिसून आले, असे शिरोडकर यांनी सांगितले.
धारबांदोडा तालुक्याला शेती बागायतीसाठी पाण्याची मोठी गरज भासते. धरणांचे काम पूर्ण होईपर्यंत शेतकरी कालव्यांद्वारे पाणी घेऊ शकतील. येत्या 14 रोजी केरी सत्तरी येथेल अंजुणे धरणातून तर दि. 15 रोजी सकाळी साळावली धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल. तत्पूर्वी शेल्डे येथे शेतकऱयांची बैठक घेतली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, तिळारी धरणाच्या डागडुजीचे कामही हाती घेण्यात येणार असून त्याद्वारे त्याची क्षमताही वाढविण्यात येणार आहे. उन्हाळ्यात हे काम प्रारंभ करण्यात येईल, असे शिरोडकर यांनी सांगितले.









