सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष, पोलिसांवर धाव घेण्याची पाळी
प्रतिनिधी / कुडचडे
सरकारद्वारे काजूची खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे घोषित झाल्यावर कुडचडेतील बागायतदार यार्डमध्ये काजू विकण्यासाठी उत्पादकांची गर्दी होऊ लागली आहे. शुक्रवारी सकाळी विविध भागांतून आलेल्या काजू उत्पादकांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले. त्यानंतर कुडचडेचे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन उपस्थित उत्पादकांना तसेच काजू विकत घेत असलेल्या गोवा बागायतदारच्या अधिकाऱयांना सोशल डिस्टन्सिंगच्या आवश्यकतेसंबंधी मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित उत्पादकांनी तोंडाला मास्क बांधून व एक मीटरचे अंतर राखून उभे राहून काजूची विक्री केली.
यंदा काजू उत्पादक लॉकडाऊनमुळे अडचणीत आले आहेत. सध्या काजूची खरेदी सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. कुडचडेतील बागायतदार यार्डमध्ये गोवा बागायतदार व आदर्श कृषी संस्थेने काजूची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकऱयांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणे व इतर खबरदारी घेणेही आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. पण या गोष्टी पाळण्यात येत नसल्याचे शुक्रवारप्रमाणे गुरुवारीही दिसून आले होते. सदर मुद्दा हा सहजरीत्या न घेता गंभीरपणे घ्यावा. त्यासाठी गोवा बागायतदार व इतर संस्थांनी काजू उत्पादकांच्या गावांत जाऊन काजूची खरेदी करावी व त्यांना त्यांच्या घरी राहण्यास सहकार्य करावे, असे मत सांगे व इतर भागांतून आलेल्या काजू उत्पादकांनी व्यक्त केले.