– मंत्री मायकल लोबो यांची मागणी
प्रतिनिधी / म्हापसा
अबकारी खाते राज्यात सध्या मद्यासाठय़ावर छापे मारीत असले तरी राज्यात बार ऍण्ड रेस्टॉरंट सध्या बंद आहेत. मात्र राज्य सरकारने गावात पंचायत पातळीवर वा पालिका क्षेत्रात असलेली काही मद्यालये खुली ठेवावी अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ही खुली ठेवत असताना त्यांच्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. आता येत्या दिवसात काजार सुरू होणार आहे तेथे 20 ते 25 लोक असणार वा घरात कौटुंबिक सोहळय़ास घरातील माणसे उपस्थित राहणार त्यांना मद्य आवश्यक आहे. वाढदिवस वा काजारासाठी सरकारने थोडी याबाबत शिथिलता द्यावी अशी मागणी कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना केली. म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात रुग्णाची पाहणी मुख्यमंत्र्यासोबत केल्यावर मंत्री लोबो पत्रकारांशी बोलत होते.
वाढदिवस वा लग्न सोहळय़ास सरकारने मद्य परवाना देण्यासाठी मदत करावी मात्र त्यात लिमिट घालणे आवश्यक आहे. सरकारने याबाबत विचार करावा अशी मागणी मंत्री लोबो यांनी केली. हे आपण पर्यटनदृष्टय़ा म्हणत नाही मात्र आमचे जे कुणी स्थानिक नागरिक आहेत त्यांना थोडीफार सुविधा याबाबत मिळू दे अशी मागणी लोबो यांनी केली.
खलाशाना गोव्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. जे गोव्यातील नागरिक विदेशात आहेत त्यानाही पुन्हा देशात आणणे गरजेचे आहे असे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले. विदेशाहून येणाऱया नागरिकांना होम कोरोनटाईन न करता त्यांना सरकारतर्फे कोरोनटाईन करावे. देशात आणल्यावर त्यांना घरी न पाठवता सरकारच्या देखरेखीखाली ठेवणे अत्यावश्यक आहे. मात्र हे 3 मे पर्यंत करणे शक्य नाही. 3 मे रोजी नवीन गाईडलाईन येणार असून त्यात या विदेशात अडकलेल्यांचा प्रश्न आवश्य असणार आहे. खास चार्टर विमानाने गोवा, मुंबई, बेंगलोर, चेन्नई आदी ठिकाणच्या नागरिकांना देशात आणून त्यांना खास एकत्रित ठेवणे गरजेचे आहे. आम्हाला विदेशी चलन येते त्या पैशाचा उपयोग या कामी करावा असे मंत्री लोबो म्हणाले. या नागरिकांसाठी मोफत कोरोनटाईन सेवा उपलब्ध करून द्यावी असे मंत्र्यांनी सांगितले.
पोलीस अधिकारी आकारतात ट्रकमागे 500 रुपये लाच
आपण पर्रा येथे पंचायतीचे काम करण्यासाठी पेडणे मतदारसंघातून रेती आणली होती याबाबत आपल्यावर अनेक आरोप झाले मात्र त्यांनी आरोपाचे खंडन केले. आपल्या गावातील नागरिकांच्या सोयीसाठी आपण कायदेशीररित्या डम केलेली पूर्वीची रेती आणल्याचे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले. यात काहीच एक्सटेन्शनचा प्रश्नच नाही उलट आपण सर्व कागदोपत्री व्यवहार करून रेती आणली आहे. आपले ट्रक मुद्दामहून अडविण्यात आले आहे कारण आपण पोलिसांना काहीत देत नाही. येथून येणाऱया ट्रकामागे एक पोलीस अधिकारी 500 रुपये उकळतो असा आरोप मंत्र्यांनी केला. विस्माक खून प्रकरणी अधिकारी 3 वर्षे निलंबित होता. तरी त्यांना समज येत नाही. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणी केल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. या पोलीस अधिकाऱयावर कारवाई व्हावी यासाठी आपण लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे मंत्री लोबो म्हणाले.









