कागल / प्रतिनिधी
भरधाव वेगात चाललेल्या ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून ठोकरल्याने गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला. कागल – निढोरी रोडवर व्हन्नूर फाट्याजवळ मंगळवारी ही दुर्घटना घडली. छाया संदीप भराडे ( वय ३३ ) यांचा मृत्यू झाला. कागलच्या ग्रामीण रूग्णाल्यात तपासणी करण्याकरिता जात असताना हा अपघात झाला.
दौलतवाडी ता . कागल येथील संदीप भराडे हे आपली पत्नी छाया (वय ३३ ) हिला घेऊन नियमित तपासणी करीता कागलच्या ग्रामीण रूग्णलयात चालले होते . व्हन्नूर फाट्याजवळ थांबलेल्या ऊसाच्या बैलगाडीला ओव्हरटेक करत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने भराडे यांच्या मोटरसायकलीला जोरात ठोकरले . त्यामुळे संदीप आणि छाया भराडे मोटरसायकलीवरून रस्त्यावर कोसळल्या . छाया भराडे या पाच महिन्यांच्या गरोदर होत्या. पोटावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . तर संदीप यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. घटनास्थळी कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे व त्यांच्या सहकारी पोलीसांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर छाया यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता कागलच्या गामीण रूग्णाल्यात नेण्यात आला.
छाया भराडे पाच महिन्यांच्या गरोदर होत्या. त्या नियमित तपासणीकरिता सोमवारी ग्रामीण रूग्णालयात येऊन गेल्या होत्या . सोनोग्राफीसाठी त्यांना पुन्हा मंगळवारी रुग्णालयात बोलाविले होते. त्यासाठी दौलतवाडीहून दोघेजण मोटरसायकलीवरून कागलला चालले होते. दरम्यान हा अपघात झाला. भराडे यांना दोन मुली आहेत. रूग्णालयात भराडे यांच्या नातेवाईकांसह दौलतवाडी येथील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.









