वार्ताहर/ निपाणी
आपला पुतण्या बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध घ्या, अशी विनवणी करून फिर्याद देणाऱया काकानेच पुतण्याचा सुपारी देऊन खून केल्याच्या घटनेचा उलगडा मंगळवारी निपाणी ग्रामीण पोलिसांनी केला. यामुळे संपूर्ण निपाणी तालुका हादरला असून सुपारी देऊन खून झालेल्या तालुक्यातील पहिल्या घटनेमुळे चिंता व्यक्त होत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सतीश दादासाहेब पाटील (वय 45) याच्यासह अमोल प्रकाश वड्डर (वय 36, दोघेही रा. बेनाडी) यांना सोमवारी गजाआड करून न्यायालयासमोर हजर करत त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. तर मंगळवारी दिलीप परशराम वड्डर (वय 38 रा. व्हन्नाळी, ता. कागल), विकास वकील पाटील (वय 25 रा. खेबवड, ता. करवीर), बाबासाहेब पांडूरंग कांबळे (वय 47, रा. व्हन्नाळी, ता. कागल) अशा तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करत पोलीस कोठडी दिली आहे. संशयित आरोपींकडून इर्टीगा कारसह रोख रक्कम 2 लाख 23 हजार 500 जप्त केले आहेत. विशाल उर्फ आप्पासो महेश पाटील (वय 25 रा. बेनाडी) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.
जुनोनी येथे सापडली कार
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आपला पुतण्या विशाल हा दि. 27 सप्टेंबर रोजी कार धुवून आणतो, असे सांगून घराबाहेर पडला, तो घरीच परतला नाही, अशी फिर्याद काका सतीश याने 30 सप्टेंबर रोजी निपाणी ग्रामीण पोलिसात दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. याच दरम्यान सोलापूर जिल्हय़ातील सांगोला पोलिसांनी 9 ऑक्टोबर रोजी जुनोनी येथे इर्टीगा कार आढळल्याची ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.
कॉल डिटेल्समधून सुगावा
कार आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी 10 ऑक्टोबर रोजी तातडीने जात कार ताब्यात घेऊन पंचनामा केला. पण तेथे बेपत्ता विशालचा कोठेच सुगावा लागला नाही. यामुळे निपाणीत येऊन फिर्याददार काका सतीश याला तीनवेळा माहिती घेण्यासाठी बोलावले. पण प्रतिसाद दिला नाही. यामुळे कॉल डिटेल्सची तपासणी केल्यानंतर संशय बळावल्याने पोलिसांनी बेनाडीत जाऊन सतीशला विचारणा केली. तरीही काहीच माहिती मिळत नव्हती. सतीशकडून फक्त उडवा-उडवीची उत्तरे दिली जात होती.
27 रोजीच खून
सतीशने उडवा-उडवीची उत्तरे देताना काही वेगळेच सांगायला सुरुवात केली असता संशय बळावल्याने पोलिसांनी सतीशला धारेवर धरले. यातून सतीश याने आपणच मालमत्तेच्या वादातून 6 लाखाची सुपारी देऊन पुतण्या विशाल याचा खून केल्याचे कबूल केले. तो दारु पित होता, आजीला मारहाण करत होता. मालमत्तेत वाटणी मागत होता, अशीही कारणे सांगितली. या खुनासाठी संशयित आरोपी अमोल याच्या मध्यस्थीने संशयित आरोपी दिलीप, विकास व बाबासाहेब यांना 6 लाख देण्याचे कबूल केले होते. त्यानुसार पहिला दीड तर नंतर साडेचार लाख रुपये दिले. 27 रोजी घराजवळच पोते उचलण्याचे कारण सांगून विशाल याला बोलावले व तेथेच त्याचा खून केला. नंतर मृतदेह पोत्यात घालून अनदूर-गगनबावडा या घाटात टाकला व कार जुनोनी येथे सोडली.
संशयित गजाआड
अशा प्रकारे खुनाचा उलगडा होताच पोलिसांनी संशयित आरोपी सतीश पाटील व अमोल वड्डर यांना प्रथम ताब्यात घेतले. नंतर मंगळवारी दिलीप वड्डर, विकास पाटील, बाबासाहेब कांबळे या तिघांना ताब्यात घेतले. तिघांना पोलीस कोठडी घेतली असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, डीवायएसपी मनोजकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय संतोष सत्यनायक, फौजदार बी. एस. तळवार यांच्यासह एस. ए. तोळगे, एस. आय. कंबार, असगर तासिलदार, प्रकाश सावजी, संजय कारगौडर, कलगोंडा पाटील, प्रवीण करणजगी, श्रीशैल गळतगे, एल. एस. कोचरी हे तपास कार्यात सहभागी आहेत.









